sadabhau khot gets y level security from central government : केंद्रीय गृहखात्याने महाराष्ट्रातल्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाचे संरक्षण दिले आहे. यासदंर्भातले आदेश देण्यात आले आहेत. पवार कुटुंबापासून आम्हाला धोका असे सदाभाऊ खोत म्हणाले होते.
वाय दर्जाच्या संरक्षण व्यवस्थेत अकरा जण संरक्षणाची जबाबदारी हाताळतात. यात एक किंवा दोन एनएसजी कमांडो आणि एक किंवा दोन पीएसओ असतात. संरक्षण करणाऱ्या अकरा जणांपैकी एक कमांडर आणि चार कॉन्स्टेबल घराचे रक्षण करतात. उर्वरित सहा जण तीन पाळ्यांमध्ये संबंधित व्यक्तीचे रक्षण करतात. भारतात ज्यांना केंद्राकडून संरक्षण मिळते त्यातील बहुसंख्य जणांना वाय दर्जाचे संरक्षण दिले जाते.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि विधानसभेवर निवडून गेलेले अपक्ष आमदार रवी राणा यांना केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाचे संरक्षण दिले. वाय प्लस प्रकारात एक सीआरपीएफ कमांडर आणि चार कॉन्स्टेबल घराचे रक्षण करतात आणि सहा पीएसओ तीन पाळ्यांमध्ये संबंधित व्यक्तीचे रक्षण करतात. या व्यवस्थेत दोन पीएसओ कायम संबंधित व्यक्तीसोबत संरक्षणासाठी असतात.
सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वीत त्यांच्या जीवाला धोका असल्याचे केंद्राला सांगितले होते. पवार कुटुंबाकडून धोका आहे, असेही ते म्हणाले होते. माझा जीव गेला तरी चालेल पण तुमची व्यवस्था आणि मस्तवालपणे लुटीच्या माध्यमातून उभारलेला चिरेबंदी वाडा पाडल्याशिवाय हा सदाभाऊ शांत बसणार नाही, असे सदाभाऊ खोत जाहीरपणे म्हणाले होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.