मुंबईः भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना तब्येत बिघडल्यामुळे मध्य प्रदेशमधून एअरलिफ्ट करुन मुंबईत अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना रक्तदाबाचा आणि श्वसनाचा त्रास होत आहे. त्रास वाढू लागल्यामुळे मध्य प्रदेश सरकारच्या विशेष छोटेखानी विमानाने खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना एअरलिफ्ट करुन मुंबईत आणण्यात आले. (Sadhvi Pragya Singh Thakur Flown To Mumbai's Kokilaben Ambani Hospital)
खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशमध्ये प्रचंड सक्रीय होत्या. पक्षाच्या वेगवेगळ्या पातळीवरील पादाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत तसेच स्थानिक प्रशासनासोबत त्यांच्या सतत बैठका सुरू होत्या. त्यांना शनिवारी मतदारसंघातील दिशा समितीच्या सदस्यांसोबत जिल्हा पंचायत कार्यालयात एक बैठक घ्यायची होती. पण या बैठकीआधीच त्यांची तब्येत बिघडली. यानंतर खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मुंबईत कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना पाच मार्च रोजी रक्तदाबाचा त्रास जाणवला. हा त्रास होत असूनही औषधे घेऊन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी कामकाज सुरू ठेवले. पण सहा मार्च रोजी शनिवारी रक्तदाबासह श्वसनाचाही त्रास जाणवू लागल्यामुळे खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना काम करणे कठीण झाले. त्यांना तातडीने मध्य प्रदेशमधून एअरलिफ्ट करुन मुंबईत अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
याआधी डिसेंबर २०२० मध्ये तब्येत बिघडल्यामुळे खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना काही काळ दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घ्यावे लागले. त्याआधी जून २०२० मध्ये एक कार्यक्रम सुरू असताना तब्येत बिघडल्यामुळे खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर बेशुद्ध झाल्या होत्या.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गंभीर आरोप झाले. या प्रकरणात प्रज्ञासिंह ठाकूर दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून जामिनावर आहेत. मुंबईच्या उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी अद्याप संपलेली नाही. जामिनावर असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी भोपाळ मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव केला. खासदार झाल्यानंतर एकदा महात्मा गांधींवर गोळ्या झाडणाऱ्या गोडसेंविषयी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एक वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे काही काळ वाद निर्माण झाला होता.
तुरुंगात असताना चौकशीच्या नावाखाली प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. यामुळे आपली तब्येत कायमची खालावली, असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी न्यायालयीन सुनावणीत तसेच जामिनावर तुरुंगाबाहेर आल्यानंतर अनेकदा सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.