१००१ व्या कोविड बाधित मातेची सुखरुप प्रसूती; बाळ - बाळंतीण सुखरुप

गेल्यावर्षी म्हणजेच एप्रिल २०२० मध्ये 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित झालेल्या महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती

Safe delivery of 1001st Covid affected mother in nair hospital in mumbai
१००१ व्या कोविड बाधित मातेची सुखरुप प्रसूती; बाळ - बाळंतीण सुखरुप  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • महापालिकेच्या नायर कोविड रुग्णालयात चिमुकल्यांच्या ट्याहांचे सहस्रक
  • नायर रुग्णालयातील ३ विभागांच्या सुयोग्य समन्वयातून साधले शुभ वर्तमान
  • गेल्यावर्षी म्हणजेच एप्रिल २०२० मध्ये 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित झालेल्या महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बा. य. ल. नायर रुग्णालयात 'कोविड १९' बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने सहस्रकाचा टप्पा नुकताच ओलांडला असून तान्हुल्यांच्या ट्याह्यांच्या मंगलस्वरांनी देखील हजाराचा टप्पा ओलांडला आहे. या निमित्ताने आपल्या मुंबईने कोविड विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच एप्रिल २०२० मध्ये 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित झालेल्या महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. तेव्हापासून साधारणपणे वर्षभराच्या कालावधीत नायर रुग्णालयात १००१ कोविड बाधित मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह १९ जुळ्या बाळांचा समावेश असून यानुसार एकूण १०२२ बाळांचा जन्म नायर रुग्णालयात झाला आहे. नायर रुग्णालयातील कोविड विषयक सर्व समन्वयन हे महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक आणि अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाच्या कोविड समन्वयक डॉ. सारिका पाटील, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक, प्रसूतिशास्त्र विभागातील डॉ. गणेश शिंदे, डॉ. अलका गुप्ता, समन्वयक प्रा. डॉ. नीरज महाजन आणि भूलशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता देशपांडे व डॉ. सोना दवे या सर्वांनी तसेच सर्व संबंधीत कर्मचा-यांनी सुसमन्वय साधून या यशोगाथेला आकार दिला आहे.

मुंबई सेंट्रल परिसरात असणा-या नायर रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभागातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांनी 'पीपीई किट' घालून घामाच्या धारा वाहत असताना अक्षरशः २४ तास अविश्रांत मेहनत घेऊन नवजीवन फुलवण्यात अत्यंत महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली आहे. या वैद्यकीय कर्मचा-यांनी 'पीपीई किट घातल्यानंतर सलग सहा तास पाणी न पिता किंवा शरीरधर्मही न उरकता अव्याहतपणे काम केले आहे. या तिन्ही विभागातील अनेक डॉक्टर्स, परिचारिका वॉर्डबॉय हे गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकदा अनेक दिवस घरी न जाता रुग्णालयात राहून अथकपणे व अविरतपणे रुग्णसेवेचे काम करीत आहेत.

गेले वर्षभर सातत्याने अविश्रांत मेहनत घेणा-या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागातील डॉ. पुनम वाडे, डॉ. संतोष कोंडेकर, डॉ. विशाल सावंत, डॉ. किरण राजपूत आणि परिचारिका सिस्टर सीमा चव्हाण, सिस्टर रोझलीन डिसूजा, सिस्टर अनाया साटम यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर प्रसूतिशास्त्र विभागातील डॉ. अरुंधती तिलवे, डॉ. चैतन्य गायकवाड, डॉ. अंकिता पांडे आणि परिचारिका सिस्टर रुबी जेम्स, सिस्टर सुशिला लोके, सिस्टर रेश्मा तांडेल यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यानिमित्ताने रुग्णालयाचे संचालक तथा अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल यांनी तिन्ही विभागातील सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्या मेहनतीचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच कोविड विषयक समन्वयक डॉक्टर सारिका पाटील आणि डॉक्टर सुरभी राठी यांच्याही अविश्रांत प्रयत्नांचे कौतुक करीत त्यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

कोविड बाधित तान्हुल्यांचीही ‘कोविड’ वर मात

कोविडच्या अनुषंगाने माहिती देताना डॉक्टर सुषमा मलिक यांनी सांगितले की, कोविडचा संसर्ग हा जन्मतः होत नाही. पोटात असणा-या बाळाच्या आईला जरी कोविडचा संसर्ग असेल, तरी पोटातल्या बाळाला हा संसर्ग होत नाही. मात्र जन्मल्यानंतर आईच्या संपर्कातून हा संसर्ग होऊ शकतो. वैद्यकीय उपचार क्रमानुसार (मेडिकल प्रोटोकॉल) कोविड बाधित मातेपासून जन्मलेल्या नवजात शिशुंची कोविड विषयक वैद्यकीय चाचणी केली जाते. यानुसार वर्षभराच्या कालावधीत जन्मलेल्या तान्हुल्यांपैकी काही नवजात शिशुंची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. तथापि, त्यांच्यामध्ये कोविडची लक्षणे आढळून आली नाहीत. तसेच 'डिस्चार्ज' देण्यापूर्वी त्यांची करण्यात आलेली वैद्यकीय चाचणी 'निगेटिव्ह' आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

'सिझेरियन डिलिव्हरी' योग्यप्रकारे होण्यात भूलशास्त्र विभागाचे मोलाचे योगदान

गेल्या साधारणपणे वर्षभराच्या कालावधीत नायर रुग्णालयात कोविड बाधित मातांच्या १००१ प्रसूतिंपैकी ५९९ प्रसूती या 'नॉर्मल डिलिव्हरी' प्रकारातील होत्या. तर ४०२ प्रसूती या 'सिझेरियन डिलीवरी' प्रकारातील होत्या. 'सिजेरियन डिलीवरी' प्रकारातील प्रसूती सुखरूपपणे होण्यात नायर रुग्णालयातील भूलशास्त्र विभागाची (Anesthesia Dept.) अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.

स्वच्छता आणि साफसफाई

प्रसूतिशास्त्र विभाग आणि नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) दोन्ही विभागातील स्वच्छता आणि साफसफाई अतिशय चांगल्या प्रकारे व नियमितपणे करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी या दोन्ही विभागातील वॉर्डबॉय व कामगारांनी अतिशय मोलाची भूमिका पार पाडत आहेत. अंगावर 'पीपीई किट' चढवून व घामाच्या धारा वाहत असतानाही अक्षरश: दिवस-रात्र पद्धतीने काम करत त्यांनी या दोन्ही विभागांशी संबंधित विविध वॉर्डमध्ये चांगली साफसफाई नियमितपणे राखली आहे.

नवजात शिशुंच्या स्तनपान विषयक दक्षता आणि मातांचा पोषण आहार

नवजात शिशुंच्या सुयोग्य पोषणासाठी आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असते. तथापि, आई मुलाला स्तनपान देत असताना, संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन, "आईने कोणती काळजी घ्यावी व ती कशा प्रकारे घ्यावी?" याबाबत सविस्तर मार्गदर्शन नियमितपणे केले जात आहे. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येक मातेला सॅनिटायझरची बाटली, साबण, तोंडाला बांधायचा 'मास्क' (मुखावरण) इत्यादी बाबी नियमितपणे दिल्या जात आहेत. त्याचबरोबर आईचा आहार देखील अधिकाधिक प्रथिनयुक्त व पोषणयुक्त असावा, यासाठी आईलाही नियमितपणे पोषक नाष्टा व जेवण दिले जात आहे. यामध्ये कडधान्य, डाळी, अंडी यासारख्या बाबींचा समावेश आहे. याच बरोबर नवजात शिशुंसाठी अंगडे - टोपडे - झबलेही दिले जात आहे. तसेच काही संस्थांच्या मदतीने मातांना टूथपेस्ट, टूथब्रश, तेल, कंगवा, टॉवेल, रुमाल इत्यादी बाबींचा समावेश असलेले 'किट' दिले जात आहे.

वैद्यकीय संशोधन व लेखन प्रगतीपथावर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात कोविड बाधित मातांच्या सुखरूप प्रसूतीची घटना‌ ही उपलब्ध माहितीनुसार वैद्यकीय क्षेत्रातील आतापर्यंतची एकमेव यशोगाथा आहे. या यशोगाथेचे शास्त्रशुद्ध डॉक्युमेंटेशन आणि वैद्यकीय संशोधकीय लेखन (Research Paper) प्रगतीपथावर आहे, अशी माहितीही या निमित्ताने नायर रुग्णालयाद्वारे आवर्जून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी