Sanjay Rathod: भाजपच्या चित्रा वाघांनी प्रचंड विरोध केलेल्या संजय राठोडांना मिळालं 'हे' खातं..

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 14, 2022 | 19:42 IST

Sanjay Rathod Ministry: मंत्री संजय राठोड यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रचंड विरोध केला होता. मात्र, त्यांना या मंत्रिमंडळात मोठं मंत्रिपद देण्यात आलं आहे.

sanjay rathod who was strongly opposed by bjp chitra wagh got food and drug administration ministry shinde fadnavis govt
चित्रा वाघांनी विरोध केलेल्या राठोडांना मिळालं 'हे' खातं 
थोडं पण कामाचं
  • भाजपच्या चित्रा वाघ यांचा संजय राठोड यांच्या मंत्रिपदाला विरोध
  • संजय राठोड यांना शिंदे-फडणवीसांना महत्त्वाचं खातं
  • संजय राठोडांना नेमकं कोणतं मंत्रिपद मिळालं?

Chitra Wagh: मुंबई: शिवसेनेत (Shiv Sena) झालेल्या एका मोठ्या बंडखोरीनंतर राज्यात अतिशय अनपेक्षितपणे शिंदे-फडणवीस असं सरकार (Shinde-Fadnavis Govt) अस्तित्वात आलं. त्यानंतर जवळजवळ महिन्याभरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाला आणि अखेर आज मंत्र्यांना (Minister) खातेवाटप (Portfolio) झालं. या खाते वाटपात भाजपकडे (BJP) सर्वाधिक महत्त्वाची खाती असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळत आहे. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चर्चा ही शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या खात्याची चर्चा आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांना पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणात आपलं मंत्रिपद गमवावं लागलं होतं. पण राज्यात सत्ताबदल होताच संजय राठोड यांना पुन्हा एकदा महत्त्वाचं असं कॅबिनेट मंत्रिपद बहाल करण्यात आलं. (sanjay rathod who was strongly opposed by bjp chitra wagh got food and drug administration ministry shinde fadnavis govt)

चित्रा वाघ यांचा प्रचंड विरोध 

पूजा चव्हाण मृत्यूनंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्यानंतर भाजपने अक्षरश: रान उठवलं होतं. त्यामुळे वाढता विरोध लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठा लढा उभारला होता. चित्रा वाघ यांनी पुण्यात जाऊन अनेक आंदोलनं, पत्रकार परिषदा घेऊन संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. या सगळ्या वाढत्या रेट्यापुढे उद्धव ठाकरेंना संजय राठोडांचा राजीनामा घ्यावा लागला होता. मात्र, सत्ता बदल होताच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्री केलं.

अधिक वाचा: शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर, फडणवीसांनी अनेकांना दिला 'धक्का'

संजय राठोड यांना या सरकारमध्ये मंत्रिपद मिळताच चित्रा वाघ या प्रचंड संतापल्या. 'पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. लडेंगे… जितेंगे...' असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी संजय राठोडांच्या मंत्रिपदाला विरोध केला होता. दुसरीकडे शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी तर संजय राठोड यांना महिला व बालकल्याण खातं या सरकारने द्यावं असा सणसणीत टोलाही लगावला होता. 

अधिक वाचा: ते माणसाला बाई आणि बाईला माणूस बनवतील"गडकरींची जोरदार बॅटिंग

संजय राठोडांना कोणतं मंत्रिपद?

या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जेव्हा खाते वाटप जाहीर झालं त्यावेळी संजय राठोड यांना नेमकं कोणतं मंत्रिपद मिळालं याची सर्वाधिक चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड यांच्याकडे वन हे महत्त्वाचं खातं होतं. मात्र, आताच्या सरकारमध्ये त्यांना अन्न व औषध प्रशासन हे महत्त्वाचं खातं देण्यात आलं आहे.

संजय राठोडांना मिळालेल्या या महत्त्वाच्या खात्यानंतर आता चित्रा वाघ या त्यांच्याविरोधात कशी भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत आता सोशल मीडियावर देखील त्यांना अनेकजण सवाल विचारत आहेत. 

अधिक वाचा: "...तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी"

पूजा चव्हाण आत्महत्येचं नेमकं प्रकरण काय?

7 फेब्रुवारी 2021 ला पूजा चव्हाणने पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले होतं. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 28 फेब्रुवारी 2021 रोजी संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता.

दुसरीकडे, पूजाच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात कुठलीही तक्रार नसल्याचे लिहून दिले होते. मात्र, याप्रकरणी काही फोन रेकॉर्डिंग समोर आल्या होत्या. ज्यामध्ये पूजा चव्हाणशी फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचे सांगितले जात होतं. मात्र, या सगळ्या प्रकरणात नंतर संजय राठोड यांना क्लीन चीट देण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी