'उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळतातच', पाहा संजय राऊत असं का म्हणाले?

मुंबई
Updated Jan 02, 2020 | 13:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

sanjay raut answers to mla bhaskar jadhav on minister post 
'उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळतातच', पाहा संजय राऊत असं का म्हणाले?  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: 'उद्धव ठाकरे यांनी जर एखादा शब्द दिला असेल तर पाळतातच. 'प्राण जाये पर वचन न जाये' अशी शिकवण आम्हाला बाळासाहेबांपासूनची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द ते पाळणार नाहीत असं होणार नाही.' असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना सुनावलं आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भास्कर जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी बोलून देखील दाखवली होती. 

'भास्कर जाधव हे कोकणातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य तो मान राखला जाईल. हे संपर्ण वातावरण लवकरच शांत होईल. आपण लक्षात घेतलं पाहिजे, तीन पक्षाचं हे सरकार आहे. तसंच मंत्रिपदं ही ४३ आहे. यामुळे काही जण नाराज होणं हे सहाजिक आहे. पण असं असलं तरीही उद्धव ठाकरे सर्वांशी नक्कीच चर्चा करतील. त्यामुळे मुख्यमंत्री हे सत्तेचं योग्य वाटप करतील.' असं म्हणत संजय राऊत यांनी नाराज नेत्यांना समजविण्याचा प्रयत्न केला आहे. 

दरम्यान, याचवेळी संजय राऊत असंही म्हणाले की, 'शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना अडचण निर्माण होईल असं काम नेता म्हणून  केलं जात नाही.' यामुळे संजय राऊत यांच्या बोलण्याचा संपूर्ण रोख हा भास्कर राऊत आणि नाराज आमदारांकडेच होता.  

पाहा भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले होते: 

'माझा मंत्रिमंडळात समावेश असेल असं सगळ्यांना वाटत होतं. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने मला स्वत:ला देखील आश्चर्य वाटलं किंबहुना मलाच आश्चर्याचा धक्का बसला. पण आता हा विषय संपला आहे. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार हा १०० टक्के पूर्ण झाला आहे. त्यामुळे मला पक्षप्रमुखांकडून जाणून घ्यायचं आहे की, मंत्रिमंडळात जाण्यामध्ये माझी योग्यता कुठे कमी पडली? मी कुठे कमी पडलो, माझा अनुभव कुठे कमी पडला, माझी तुमच्यावरची निष्ठा कुठे कमी पडली? हे सगळं जाणून घ्यायचं आहे. तसंच पूर्वीची कटुता तुमच्या मनात आजही आहे का? हे देखील जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी त्यांची वेळही मागितली आहे. जेव्हा ते वेळ देतील तेव्हा या गोष्टीचा खुलासा करणार आहे.' 

'मी राष्ट्रवादीत होतो, त्यानंतर मी शिवसेनेत आलो. त्यामुळे कुठेतरी त्यांची आणि माझी चर्चा झालेली असावी. माझ्याबाबत मत परिवर्तन झालेलं असावं. मला त्यांच्या कुठल्यातरी शब्दावर विश्वास बसलेला असावा, कारण मी काही आता राजकारणात नवखा राहिलेलो नाही. मी राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष ही पदं भूषवली आहेत. त्यामुळे कुठे तरी दोघांचं समाधान झालेलं असावं. दोघांचा एकमेकांवर विश्वास बसलेला असावा. म्हणूनच ही प्रक्रिया जुळून आली.' असं म्हणत भास्कर जाधवांनी आपली थेट व्यक्त केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी