संजय राऊत अटकेत, ईडीची कारवाई

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 01, 2022 | 01:40 IST

Sanjay Raut Arrested : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. सोमवारी (१ ऑगस्ट २०२२) सकाळी संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टात सादर केले जाईल.

Sanjay Raut Arrested
संजय राऊत अटकेत, ईडीची कारवाई  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • संजय राऊत अटकेत, ईडीची कारवाई
  • सोमवारी (१ ऑगस्ट २०२२) सकाळी संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टात सादर केले जाईल
  • संजय राऊत यांना बेहिशेबी पैशांच्या प्रकरणात अटक

Sanjay Raut Arrested : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. सोमवारी (१ ऑगस्ट २०२२) सकाळी संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टात सादर केले जाईल. संजय राऊत यांना बेहिशेबी पैशांच्या प्रकरणात अटक करण्यात आली. याआधी त्यांची दीर्घ काळ पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी झाली.

अटकेनंतरची प्रक्रिया

ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. आता पुढील काही तासांत संजय राऊत यांची वैद्यकीय तपासणी होईल. यानंतर सोमवारी सकाळी ११ नंतर संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टात सादर केले जाईल. चौकशी आणि तापासातून हाती आलेली माहिती सांगून ईडीचे अधिकारी संजय राऊत यांचा जास्तीत जास्त रिमांड मिळविण्यासाठी प्रयत्न करतील. संजय राऊत यांना किती काळ ईडीच्या कोठडीत ठेवायचे याचा निर्णय कोर्टात होणार आहे.

महिलेला शिवीगाळ, मुंबई पोलिसांनी जाखल केली तक्रार

संजय राऊत यांच्या विरोधात फोनवरून महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मुंबई पोलिसांनी वाकोला पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल केला आहे. सध्या संजय राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. पण जामीन मिळवण्यात यशस्वी झाल्यास राऊत यांना महिलेला फोनवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.

पत्राचाळचा उल्लेख 'अरेस्ट मेमो'मध्ये नाही : सुनिल राऊत

संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. अटक करण्याआधी नातलगांना 'अरेस्ट मेमो' दाखवतात. या पद्धतीनुसार संजय राऊत यांचा 'अरेस्ट मेमो' सुनिल राऊत  यांना दाखविण्यात आला. या 'अरेस्ट मेमो'मध्ये पत्राचाळ किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यवहाराचा उल्लेख नाही, असे सुनिल राऊत यांनी पत्रकारांना सांगितले. अरेस्ट मेमोची कॉपी कोर्टात हजर केले जाईल त्यावेळी मिळणार असल्यामुळे याक्षणी आपल्याकडे नाही, असेही सुनिल राऊत म्हणाले. अटकेची कारवाई राजकीय सूडातून झाल्याचा आरोप सुनिल राऊत यांनी केला तसेच संजय राऊत न्यायालयीन लढा लढतील, असे सुनिल राऊत म्हणाले.

ईडीची सकाळपासून सुरू होती कारवाई

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी सकाळीच ईडीचे अधिकारी दाखल झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांच्या घराची झाडाझडती झाली. तसेच संजय राऊत यांची चौकशी झाली. या चौकशीअंती संजय राऊत यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. यानंतर ईडीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये नेऊन पुन्हा एकदा संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली. रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली.

अधिक वाचा : Viral Audio : ७० सेकंदात शिव्यांचा पाऊस, टीम संजय राऊत कायदेशीर कारवाईच्या विचारात

समन्स बजावले होते पण...

मुंबईतील पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर सातत्याने होत आहे. या प्रकरणात ईडीने २० जुलै आणि २७ जुलै रोजी संजय राऊत यांना समन्स बजावले होते. पण संसदेच्या अधिवेशवनाचे कारण देत संजय राऊत ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले. अखेर ईडीने रविवार ३१ जुलै २०२२ रोजी थेट संजय राऊत यांच्या घरी धडक मारली. यानंतर संजय राऊत यांची दीर्घकाळ चौकशी झाली. चौकशीअंती संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आले. ईडीच्या  मुंबई कार्यालयात नेऊन संजय राऊत यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली.

पत्राचाळ प्रकरण नेमकं आहे तरी काय?

मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊतांची मे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचे पत्राचाळ पुनर्विकासाचे म्हाडासोबत कंत्राट. म्हाडा, भाडेकरूंसाठी फ्लॅट न बांधताच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने ९ विकासकांना ९०१ कोटी रुपयांना एफएसआय विकला.

पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रवीण राऊत यांच्यावर आरोप आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार फ्लॅट बांधायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट भाडेकरूंना द्यायचे होते. तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. फ्लॅट विकण्याच्या नावाखाली १३८ कोटी जमा केले. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली.

एकूण १०३९.७९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. १०० कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले. प्रवीण राऊत यांनी ही रक्कम जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे हस्तांतरित केली. ५५ लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना दिल्याचं समोर आलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी