Sanjay Raut Family connected with Wine Beer Liquor business : मुंबई : महाराष्ट्रात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. हा निर्णय गुरुवार २७ जानेवारी २०२२ रोजी जाहीर झाला आणि भारतीय जनता पार्टीचे नेता किरीट सोमय्या यांनी आज (रविवार ३० जानेवारी २०२२) पत्रकार परिषद घेऊन थेट संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप केला. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या परिवाराचा वाईन व्यवसायाशी संबंध आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
मॅगपी ग्लोबल लिमिटेड या अशोक गर्ग यांच्या कंपनीसोबत संजय राऊत परिवाराची भागीदारी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. अशोक गर्ग यांनी २००६ मध्ये मॅगपी ग्लोबल लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. नंतर १२ जानेवारी २०१० रोजी मॅगपी डी एफ एस या कंपनीची स्थापना झाली. या दोन्ही कंपन्यांचा मुख्य व्यवसाय हॉटेल, क्लब, पब या ठिकाणी वाईन वितरण करणे हा आहे. संजय राऊत परिवाराने १६ एप्रिल २०२१ रोजी अशोक भागीदारी करार केला. विधीता संजय राऊत आणि पूर्वशी संजय राऊत या संजय राऊत यांच्या दोन्ही कन्या मॅगपी डी एफ एस या कंपनीच्या संचालक झाल्या; असे किरीट सोमय्या म्हणाले.
अशोक गर्ग यांच्या मॅगपी समुहाची वाईन व्यवसायातील वार्षिक उलाढाल १०० कोटी रुपयांची आहे. संजय राऊत यांच्या दोन्ही कन्या मॅगपी डी एफ एस आणि राऊत एन्टरटेनमेंट या दोनच कंपन्यांच्या संचालक आहेत. यापैकी राऊत एन्टरटेनमेंट या कंपनीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सिनेमा काढला होता. दुसरी कंपनी वाईन व्यवसायात गुंतली आहे; असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
अशोक गर्ग यांच्या कंपनीचे मूळ नाव मादक प्रायव्हेट लिमिटेड असे होते. नंतर कंपनीने नाव बदलले; अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. वाईन संदर्भातल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचा आणि राऊत कुटुंबाचा महसूल निश्चित वाढणार आहे; असेही किरीट सोमय्या म्हणाले. राऊत यांच्या व्यवसायाशी संबंधित आणखी माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.