संजय राऊत यांनी अजित पवारांना पाठवला 'हा' मेसेज

मुंबई
Updated Nov 03, 2019 | 15:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sanjay Raut send message to Ajit Pawar: राज्यात सत्ता स्थापनेवरुन शिवसेना-भाजपत रस्सीखेच सुरु असताना आता अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

sanjay raut send message ajit pawar vidhan sabha election result 2019 shiv sena ncp politics news marathi
अजित पवारांना संजय राऊत यांचा मेसेज   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • संजय राऊत यांचा अजित पवारांना मेसेज 
 • बैठकीत असताना अजित पवारांना मेसेज
 • जनतेचा कौल महायुतीच्या बाजुने - अजित पवार

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर नऊ दिवस उलटल्यानंतरही राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाहीये. सत्ता स्थापन करण्यावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. संजय राऊत यांनी आपल्याला थोड्यावेळापूर्वी मेसेज केल्याची माहिती अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मुंबईत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हटलं, "बैठकीत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांचा एक मेसेज मला आला. या मेसेजमध्ये लिहिलं आहे, 'नमस्कार, जय महाराष्ट्र मी संजय राऊत'. त्यांना नेमकं काय बोलायचं आहे हे त्यांना कॉल केल्यावरच स्पष्ट होईल असं अजित पवारांनी म्हटलं आहे".

संजय राऊत यांनी १७५ चा मॅजिक फिगर आकडा कुठुन आणला माहिती नाहीये. जनतेने कौल महायुतीच्या बाजुने दिला आहे आणि शरद पवार हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाहीये असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची रोखठोक मुलाखत आली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी सध्याच्या परिस्थितीत सत्ता स्थापनेसाठी काय घडू शकतं याचे पाच पर्याय दिले आहेत. या पाच पर्यायापैकी एक पर्याय असा होता की, भाजप विश्वासदर्शक ठरावा दरम्यान अपयशी झाल्यास शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करेल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतरांच्या मदतीने बहुमताचा आकडा १७० पर्यंत पोहोचेल. 

संजय राऊत यांनी आपल्या मुलाखतीत व्यक्त केलेलं हे मतं आणि त्यानंतर अजित पवारांना पाठवलेल्या मेसेज यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आलं आहे. 

निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल

 1. भाजप - १०५ 
 2. शिवसेना - ५६ 
 3. राष्ट्रवादी - ५४ 
 4. काँग्रेस - ४४ 
 5. इतर - १३ 
 6. बहुजन विकास आघाडी - ३ 
 7. एमआयएम - २ 
 8. समाजवादी पक्ष - २ 
 9. प्रहार जनशक्ती पक्ष - २ 
 10. मनसे - १ 
 11. स्वाभिमानी पक्ष - १ 
 12. सीपीआय - १ 
 13. जन सुराज्य शक्ती - १ 
 14. क्रांतिकारी शेतकरी पक्ष - १
 15. शेकाप - १ 
 16. राष्ट्रीय समाज पक्ष - १ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी