'...त्यासाठी संजय राऊतांनी भाजपची माफी मागावी,' पाहा कुणी केली आक्रमक मागणी

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 07, 2019 | 17:10 IST

Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपची माफी मागावी, त्याशिवाय भाजपने पुढे जाऊ नये. अशी थेट मागणी भाजपमधील एका गटाने केली आहे.

sanjay raut should apologize to bjp  for this see who made aggressive demand
'...त्यासाठी संजय राऊतांनी भाजपची माफी मागावी,' पाहा कुणी केली आक्रमक मागणी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • संजय राऊतांनी भाजपची माफी मागावी, भाजपमधील एका गटाची मागणी
  • भाजप आणि शिवसेनेतील ताण वाढला, दोन्ही पक्ष आपआपल्या भूमिकेवर ठाम
  • शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या संजय राऊतांवर भाजप नाराज

मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड धुसफूस सुरु आहे. त्यामुळे आता तब्बल १४ दिवस उलटून गेलेले असले तरीही सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. पण याच सगळ्यादरम्यान, राज्यात एका नेत्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या नेत्याने साधारण गेले १५ दिवस संपूर्ण राजकीय चर्चा आपल्या अवतीभवती ठेवली आहे. हा नेता नेमका कोण असा प्रश्न आपल्याला देखील पडला असणार. तर हे नेते म्हणजे शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. 

गेले काही दिवस शिवसेनेची हीच मुलुखमैदानी तोफ सतत धडधडत आहे. ज्यामुळे भाजपचे नेते अक्षरश: घायाळ होत आहे. राज्यात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. अशावेळी शिवसेनेने आपली मागणी लावून धरली आहे. ५०-५० फॉर्म्युला लोकसभेच्या वेळीच ठरला होता. त्यामुळे भाजपने आमची मागणी पूर्ण करावी अशी भूमिका शिवसेनेने सातत्याने मांडली. हीच मागणी मांडण्याचं काम हे गेले काही दिवस संजय राऊत यांनी केलं आहे. पण आता या सगळ्यादरम्यान संजय राऊत हे भाजपच्या दृष्टीने खलनायकाच्या भूमिकेत गेले आहेत. यामुळे आता भाजपमधील एका गटाने संजय राऊतांविरोधात ताठर भूमिका घेतली आहे. 
 
संजय राऊत यांनी भाजपची माफी मागितली पाहिजे. अशी थेट मागणी  भाजपच्या एका गटाकडून होत असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. एवढंच नव्हे तर या गटाची अशीही मागणी आहे की,  संजय राऊत यांच्या  माफीशिवाय भाजपने पुढे जाऊ नये. त्याशिवाय कोणतीही चर्चा शिवसेनेशी करु नये. प्रसंगी राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी चालेल. अशी आक्रमक मागणी आता भाजपच्या या गटाकडून करण्यात येत आहे. 

शिवसेनेची बाजू मांडत असताना संजय राऊत यांनी भाजपवर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी संजय राऊतांनी सामनामधून देखील भाजपवर निशाणा साधणं सुरुच ठेवलं. यामुळे भाजपमध्ये राऊतांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. म्हणूनच राऊतांनी भाजपची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. 

दुसरीकडे असं असलं तरीही संजय राऊत यांचा आक्रमक बाणा सतत पाहायाल मिळतो आहे. आपण पक्षाची अधिकृत भूमिका मांडत आहोत असं  संजय राऊतांकडून वारंवार सांगितलं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी