संजय राऊत यांचं 'हे' ट्विट नेमकं कशाचा इशारा देतंय...

मुंबई
पूजा विचारे
Updated Oct 25, 2019 | 16:31 IST

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर आता युतीची चर्चा रंगू लागली.शिवसेनेचे नेते संजय राऊत एक फोटो ट्विट केला आहे. राऊतांच्या ट्विटमुळे आणखीच गोंधळ निर्माण झाला आहे. 

Sanjay raut
संजय राऊत यांचं 'हे' ट्विट नेमकं कशाचा इशारा देतंय...  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला.
  • शिवसेनेचे नेते संजय राऊत एक फोटो ट्विट केला आहे.
  • राऊतांच्या ट्विटमुळे आणखीच गोंधळ निर्माण झाला आहे. 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला.  निकाल जाहीर झाल्यानंतर आता युतीची चर्चा रंगू लागली आहे. निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. पण आता खरी लढत सुरू झाली आहे ती मुख्यमंत्रीपदासाठी. आता मुख्यमंत्रीपदासाठी युतीत रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन आपआपली मतं व्यक्त केली. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येक वेळी भाजपची अडचण समजून घेणार नाही तर दुसरीकडे महायुतीतचंच सरकार होईल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत एक फोटो ट्विट केला आहे. राऊतांच्या ट्विटमुळे आणखीच गोंधळ निर्माण झाला आहे. 

संजय राऊत यांनी ट्विटर एक फोटो ट्विट केला आहे. या ट्विटच्या फोटोत एक वाघ आहे. ( वाघ म्हणजे शिवसेनेचं चिन्ह) या वाघाच्या गळ्यात एक घडयाळ दिसतंय. घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि हा वाघ कमळाचा सुंगध घेताना दिसतं आहे. कमळ म्हणजे भारतीय जनता पक्षाचं चिन्ह. तसंच वाघाच्या पंजावर काँग्रेसचं चिन्ह दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पंजा हे काँग्रेसचं पक्षचिन्ह आहे. या फोटोसोबतच संजय राऊत यांनी कॅप्शन दिलं आहे की, व्यंग चित्रकाराची कमाल! बुरा न मानो दिवाली है..

 

 

संजय राऊत यांच्या ट्विटमुळे एक गोंधळच निर्माण झाला आहे. दुसरीकडे शिवसेनेनं सामनामध्ये भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर नाराजी दाखवत राष्ट्रवादी- काँग्रेससह शरद पवारांचं कौतुक केलं आहे. भाजपनं सर्वाधिक १०२ जागा जिंकल्या असल्या तरी सत्तेच्या चाव्या ५७ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेच्याच हाती आल्या आहेत, असं सांगायला ही शिवसेना विसरली नाही आहे. 

अग्रलेखातून निशाणा 

शिवसेनेनं सामना या वृत्तपत्रातून भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ही शिवरायांचीच प्रेरणा, उतू नका मातू नका असं सामनामध्ये म्हटलं आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं की, संपूर्ण निवडणूक निकालांचे विश्लेषण आजच करता येणार नाही. जनतेने कौल दिला आहे. तो स्वीकारून आम्ही महाराष्ट्राला आज आहे त्यापेक्षा निश्चितच पुढे घेऊन जाऊ. हे राज्य शिवरायांचे आहे. त्यामुळे जो कौल जनतेने दिला त्यामागे शिवरायांची प्रेरणा नक्कीच असेल. महाराष्ट्राच्या जनतेला सत्तेचा उतमात मान्य नव्हता आणि नाही. आमचे पाय जमिनीवरच होते आणि आहेत. निवडणुका संपल्या. महाराष्ट्राच्या चरणी आम्ही पुन्हा सेवा रुजू करीत आहोत. कोण हरले, कोण जिंकले त्याची चिवडाचिवड नंतर करू. महाराष्ट्राच्या भावना दडपून कुणाला पुढे जाता येत नाही व मऱ्हाटी भावनांच्या छाताडावर पाय ठेवून कुणाला राज्य करता येत नाही. दिलेल्या शब्दास जागणारा ‘राजा’ अशी छत्रपती शिवरायांची ख्याती होती. हे राज्य शिवरायांच्या प्रेरणेनेच चालेल!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी