मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorates) यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim) लोकसभेच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana Gavali) यांच्या वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील 5 संस्थांवर छापेमारी केली. छापेमारीदरम्यान, ईडी संबंधित संस्थांनाच्या कागदपत्राची चौकशी करीत आहे. तर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. ईडीच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेच्या (Shivsena) किंवा महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Government) संबंधीत महत्त्वाच्या लोकांवर गेल्या काही दिवसांपासून या कारवाया सुरू आहेत, ठिक आहे, तुमच्या हातात शस्त्र आली, अस्त्र आली केंद्रीय तपास यंत्रणांची आणि तुम्ही काही गोष्टी खणून काढतायत, खणत रहा, पण जो खड्डा होतोय त्यात केव्हातरी तुम्ही सुद्धा पडू शकता, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
अनिल परब भेटीवर बोलताना संजय राऊत यांनी अनिल परब नेहमीच भेटत असतात, माझे सहकारही आहेत ते शिवसेनेचे मंत्री आहेत असे म्हटले आहे. ईडीची नोटीस आली म्हणून आमच्या चेहऱ्यावरचं हास्य काही मावळणार नाही. कर नाही त्याला डर कशाला, आम्ही सामोरे जाऊ. शिवसेना हे टार्गेट आहे, ते टार्गेट का केले जाते हे सर्वांना माहित आहे, पण त्याचा तसुभरही परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही. शिवसेनेचे मनोधैर्यही खचणार नाही, उलट ते अधिक मजबूत होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ही कायदेशीर लढाई आहे, कायदेशीर लढाई त्याच पद्धतीने लढायच्या आहेत. अनिल परब हे कायदा क्षेत्रातले जाणकार आहेत, ते स्वत: वकिल आहेत, त्यांना माहित आहे काय करायचे ते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.सुडाची भावना आणि बिनबुडाचं राजकारण त्यातून या सर्व कारवाया सुरु आहेत. सर्वांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही येतील असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.