Santosh Parab Beating Case : नितेश राणे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, ७ जानेवारीपर्यंत नाही होणार अटक

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 04, 2022 | 12:24 IST

संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणामुळे अडचणीत आलेले भाजप आमदार (BJP MLA) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपूत्र नितेश राणे (Nitesh Rane ) यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Nitesh Rane will not be arrested till January 7
नितेश राणेंना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पुढील सुनावणी ७ जानेवारीला दुपारी २.३० वाजता होईल.
  • अटकेच्या भीतीने नितेश राणे तब्बल आठवडाभरापासून अज्ञातवासात
  • सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन फेटाळला होता.

Nitesh Rane : मुंबई: संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणामुळे अडचणीत आलेले भाजप आमदार (BJP MLA) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपूत्र नितेश राणे (Nitesh Rane ) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास आठवड्याभरापासून अज्ञातवासात असेल्या नितेश राणेंची धकधक न्यायालयाने काहीशी कमी केली आहे. मंगळवारी सकाळी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने (State Government) ७ जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही न्यायालयात दिली. त्यामुळे नितेश राणे यांना ७ जानेवारीपर्यंत अटक होणार नाही.  

दरम्यान याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला दुपारी २.३० वाजता होईल. यावेळी पोलिसांकडून आपली बाजू मांडली जाईल. यापुर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अटकेच्या भीतीने नितेश राणे तब्बल आठवडाभरापासून अज्ञातवासात आहेत. मात्र, आता अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्याने ते अज्ञातवासातून बाहेर येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच उच्च न्यायालयाने याप्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याला मंजूरी देणे, हा देखील नितेश राणे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात आता नितेश राणे आणि सरकारी वकिलांमध्ये काय युक्तिवाद होणार, हे पाहावे लागेल. 

न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी राणे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नितीन प्रधान यांनी प्रकरणाची प्राथमिक माहिती न्यायालयाला दिली. मात्र, अर्जाला प्रतिज्ञापत्रावर सविस्तर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. त्यानंतर तोपर्यंत पोलिसांनी नितेश राणे व संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे म्हणणे प्रधान यांनी मांडले. तेव्हा पुढील सुनावणीपर्यंत पोलिसांकडून कठोर कारवाई होणार नाही, अशी हमी सरकारी वकिलांनी दिली.

यापुर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन फेटाळला होता. या जामिनाच्या सुनावणीवेळी नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला होता. ही सुनावणी तीन दिवस सुरु होती. या सुनावणीत सरकारी वकिलांनी संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश यांच्यापर्यंत कसे पोहोचले आहेत, याचे सविस्तर पुरावे कॉल डिटेल्ससह न्यायालयात सादर केले होते व त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश यांचे मोबाइल जप्त करण्याची गरज असल्याचे म्हणणे मांडले होते.  न्यायालयाने सरकारी पक्षाची बाजू उचलून धरत नितेश यांची कोठडीत चौकशी होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. या परिस्थितीत नितेश यांना जामीन दिल्यास तपास कामात अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही मत न्यायालयाने नोंदवले नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी