सावरकर म्हणाले होते की, 'गाय आमची माता नाही', भाजप हे स्वीकारेल का?: भुजबळ 

मुंबई
रोहित गोळे
Updated Dec 15, 2019 | 17:33 IST

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे. या सगळ्या प्रकरणात आता छगन भुजबळ यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

savarkar had said cow is not our mother bjp accept it chhagan bhujbal 
सावरकर म्हणाले होते की, 'गाय आमची माता नाही', भाजप हे स्वीकारेल का?: भुजबळ   |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: 'काहीही झालं तरी मी माफी मागणार नाही. माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे.' असं वक्तव्य करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आता भाजपने जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी भाजपकडून काँग्रेससोबतच शिवसेनेवर देखील टीका करण्यात येत आहे. पण आता काँग्रेस आणि शिवसेनेचा बचाव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ हे पुढे सरसावले आहेत. 

छगन भुजबळ असं म्हणाले की, 'जेव्हा मोठ्या व्यक्तींबाबत जेव्हा-जेव्हा चर्चा होते तेव्हा प्रत्येक जण हा त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर सहमत असेल असं अजिबात नाही. सावरकरांबाबत राहुल गांधी यांचे स्वत:चे काही विचार आहेत. सावरकर म्हणाले होते की, गाया आमची माता नाही. पण भाजप म्हणतं की, गाय आमची माता आहे. सावरकरांची विचारसरणी ही विज्ञानवादी होती. पण भाजप त्यांची ही विचारसरणी स्वीकार करेल? ते स्वीकारु शकत नाही.' 

दरम्यान, याचबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं की, सावरकरांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल? त्यावेळी अजित पवार असं म्हणाले की, 'उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवार हे परिपक्व नेते आहेत. ते योग्य ते निर्णय घेतील.' 

दुसरीकडे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यावरुन पलटवार केला आहे. त्यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'नेहरु-गांधी कुटुंबाच्या ५ पिढ्या देखील सावकरांच्या वारश्याशी बरोबरी करु शकत नाही. एक गोष्ट खरी आहे की, राहुल गांधी हे कधीही राहुल सावरकर होऊ शकत नाही. वीर सावरकर ही एक राष्ट्रीय विभूती आहे. ज्याचा भारताच्या राजकीय व्यवस्थेवर सभ्यतेवर सभ्यपणे प्रभाव आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ते श्रद्धेयच असतील.' 

दिल्लीच्या रामलीला मैदानावर शनिवारी काँग्रेसने भारत बचाओ रॅली आयोजित केली होती. त्यामध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, 'संसदेत शुक्रवारी भाजपचे खासदार म्हणत होते की, मी रेप इन इंडिया या वक्तव्यावर माफी मागावी. मी जे खरं बोललो त्यासाठी ही लोकं मला म्हणत आहेत की, मी माफी मागावी. माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. मी जे खरं बोललो त्यासाठी मी कधीही माफी मागणार नाही. मी एकवेळ मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेस नेता यासाठी माफी मागणार नाही.' 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी