शरद पवारांनी 'त्या' मुद्द्यावरुन सुशीलकुमार शिंदेंना सुनावलं!, पाहा काय म्हणाले पवार

मुंबई
Updated Oct 09, 2019 | 16:32 IST

Sharad Pawar: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांना खडे बोल सुनावले आहेत. 

sharad pawar criticized sushilkumar shinde on the issue of merger
शरद पवारांनी 'त्या' मुद्द्यावरुन सुशीलकुमार शिंदेंना सुनावलं!, पाहा काय म्हणाले पवार  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदेंना सुनावले खडे बोल
  • काँग्रेस-राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल असं वक्तव्य केलं होतं सुशीलकुमार शिंदेंनी
  • विलीनीकरणाबाबत सुशीलकुमार शिंदेंच मत वैयक्तिक असल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडे बोल सुनावले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन सध्या बरंच राजकारण सुरु आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं हे वक्तव्य दोन्ही पक्षांना अडचणीत आणणारं ठरत आहे. त्यामुळे आता शिंदेच्या वक्तव्यावर स्वत: पवारांनी उत्तर दिलं आहे. 

शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदेंना काय दिलं उत्तर

'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची स्थिती काय आहे ते  मला जास्त माहिती आहे. सुशीलकुमार हे बहुदा स्वत:च्या पक्षाबाबत बोलत असतील. मी किंवा माझा पक्ष अजिबात थकलेला नाही. आम्ही भाजपला विरोध करण्यासाठी सज्ज आहोत. महाराष्ट्रात लोकांना परिवर्तन हवं. त्यामुले या निवडणुकीत नक्कीच सत्ताबदल होईल.' असं म्हणत शरद पवार यांनी सुशीलकुमार यांना खडे बोल सुनावले आहेत. 

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. 'विलिनीकरणाबाबतचं सुशीलकुमार शिंदे यांचं वैयक्तिक मत आहे. ती काही काँग्रेस पक्षाची भूमिका नाही. विलीनीकरणाबाबत शरद पवार काय ते ठरवतील. तूर्तास वेगळे पक्ष म्हणून आम्ही भूमिका मांडतो आहे. विधानसभा निवडणुकीत देखील आम्ही वेगळे पक्ष म्हणून लोकांसमोर जात आहोत.' असं अजित पवार यावेळी म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले होते सुशीलकुमार शिंदे?

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे भविष्यात एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण आता दोन्ही पक्ष थकले आहेत. दोन्ही पक्ष हे एकाच आईच्या मांडीवर वाढले आहेत. आतापर्यंत जे काही झालं त्याविषयी आमच्या आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलतील.' असं सुशीलकुमार म्हणाले होते. 

पण आता सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याला स्वत: शरद पवारांनी उत्तर दिल्याने आता हा मुद्दा जवळपास निकालात निघाला आहे. पण भाजप आणि शिवसेनेकडून याविषयावरुन दोन्ही पक्षांना टार्गेट करण्याची शक्यता आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...