शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 15 मुद्दे 

मुंबई
पूजा विचारे
Updated Nov 06, 2019 | 15:14 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुंबईतील यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान येथे  पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी देशासह राज्यातल्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

Sharad Pawar
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 15 मुद्दे   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुंबईतील यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेतली.
 • या पत्रकार परिषदेत त्यांनी देशासह राज्यातल्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
 • शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाच्या मुद्दे काय आहेत ते जाणून घेऊया. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुंबईतील यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान येथे  पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी देशासह राज्यातल्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत पवारांनी राज्यातल्या सत्ता संघर्ष, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत, अयोध्याचा नियोजित निकाल आणि दिल्लीतल्या पोलीस- वकिलांचं सुरू असलेल्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाच्या मुद्दे काय आहेत ते जाणून घेऊया. 

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 15 मुद्दे 

 1. विमा कंपन्यांनी आता शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. केंद्रातून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. पण विमा कंपन्या जबाबदारी पार पडत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना कंपन्यांना द्याव्यात. बैठकीत केंद्रानं विमा कंपन्यांना त्यांच्या कामाबाबत निर्देश द्यावे. 
 2. अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे. अनेक विमा कंपन्या त्यांच्या कामात दिरंगाई करत आहेत. शेतकऱ्यांना ताठकळत ठेवू नये- शरद पवार 
 3. राज्यातल्या परिस्थितीवर बोलण्यासारखं काही नाही. भाजपा-शिवसेना या दोघांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे. जनतेने आघाडीला विरोधी बाकावर बसण्याची सुसंधी दिली आहे, त्यामुळे ते काम समर्थपणे पार पाडण्याची आमची भूमिका आहे. 
 4. शरद पवारांना तुम्ही मुख्यमंत्री होऊ इच्छिता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले की, मी चारवेळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भुषवलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री होण्याची कोणतीही अपेक्षा नाही. असं कोणतंही समीकरण महाराष्ट्रात दिसणार नाही, असं पवार यांनी म्हटलं.
 5. आम्हाला जनतेचा कौलच विरोधी पक्षात बसण्यासाठीचा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आकडे बहुमतापर्यंत जुळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. 
 6. आज सकाळीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, संजय राऊत कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. ते नेहमीसारखे भेटायला आले होते. त्यांची केवळ सदिच्छा भेट दिली. राज्यसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली. 
 7. राष्ट्रपती राजवट लागू होईल ही भीती फक्त शिवसेनेला वाटते आहे. शिवसेना आणि भाजप यांची 25 वर्षांची युती आहे. 25 वर्षे सडले तरीही एकत्र लढले. 
 8. आपल्याकडे कोणीही प्रस्ताव घेऊन आलेलं नाही. तसंच संख्याबळ असतं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही सरकार स्थापन केलं असतं. तसं ते झालेलं नाही, लोकांनी त्यांचा निर्णय दिला आहे. आता भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं आणि आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी.
 9. काँग्रेसचा निर्णय काय आहे हे अद्याप आमच्या कानावर आलेला नाही. आम्ही एकत्रित निवडणूक लढलो, त्यामुळे निर्णय एकत्रित व्हावा, अशी आमची भावना आहे. 
 10. मागच्या काही काळात अनेक राज्यात बहुमत नसतानाही अमित शहा यांनी सत्ता स्थापन केली. मग महाराष्ट्रात ते लक्ष घालत नाहीत असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले की, असं आहे, त्यांच्या या सत्तास्थापनेच्या कौशल्याची तुमच्याप्रमाणे आम्हीही आतुरतेनं वाट पाहत आहोत. त्यांनी सरकार बनवावं.
 11. अहमद पटेल आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवर पवारांनी स्मितहास्य करत प्रतिक्रिया दिली. अहमद पटेल जबाबदार व्यक्ती आहेत. गडकरींकडे कोणी गेलं असेल तर ते जरूर रस्त्यांच्या कामासाठी गेलं असणार. ते दुसऱ्या कुठल्या कारणासाठी भेटले असतील असं वाटत नाही. 
 12. लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्येचा निकाल येणार आहे. निकाल लागल्यानंतर समाजातील कोणत्याही घटकाने हा निकाल आपल्या विरोधी लागला आहे, असा विचार करू नये. न्यायालयीन निर्णय लागल्यावर तो सामंजस्याने स्वीकारण्याची गरज आहे. 
 13. निकाल काहीही लागला तरी कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाला मदत करावी. जी परिस्थिती १९९२ साली उद्भवली त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे आवाहन मी करतो. 
 14. काल दिल्लीत युनिफॉर्ममधील पोलिसाला मारहाण झाली. पोलिसांवरील हल्ल्यांची संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे त्यामुळे देशातील पोलिसांचे खच्चीकरण  होते आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या व्यक्तींचे अशा रीतीने मनोबल खच्ची झाले तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. दिल्ली पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी दिल्लीच्या जनतेने भूमिका घेतली हे स्वागतार्ह आहे.
 15. पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत. त्यांना 18 तास ड्युटी करावी लागते. अशी स्थितीत हा वर्ग नाखूश झाला तर ही गंभीर गोष्ट आहे. दिल्लीत जो प्रकार घडला त्याची गंभीर नोंद घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने यात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी