...अखेर पवारांनी 'त्या' मोठ्या प्रश्नाचं उत्तर दिलं!

मुंबई
Updated Oct 31, 2019 | 16:13 IST

Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या नेत्याला विधीमंडळाच्या गटनेतेपदी विराजमान करणार याबाबत बरेच अंदाज वर्तवले जात होते. अखेर आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. 

sharad pawar preferred by ajit pawar's name as opposition leader
...अखेर पवारांनी 'त्या' मोठ्या प्रश्नाचं उत्तर दिलं!  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवारांच्या नावाला विधीमंडळ नेता म्हणून पसंती
  • शरद पवारांनी विधीमंडळ नेत्याचा प्रश्न सोडवला
  • विधीमंडळ नेता म्हणून अनेकांच्या नावाची होती चर्चा

मुंबई: विधानसभा निवडणूक २०१९ निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. जर भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेसाठी युती झाली तर विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच जाणार याबाबत कुणाचंही दुमत नाही. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवार) मुंबईत सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेऊन अजित पवार यांची विधीमंडळ गटनेते पदी निवड केली. त्यामुळे आता विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार हेच विधानसभेत दिसणार की दुसरं कोणी हे आपल्याला येत्या काही दिवसातच समजणार आहे. खरं तर गटनेते पदी अजित पवार यांच्या नावाची निवड करणं हे तसं फार सोप्पं नव्हतं. कारण की, राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांची नावं यावेळी चर्चेत होती. पण अखेर अजित पवार यांनीच बाजी मारली. पण असं असलं तरी विरोधी पक्ष नेते पदी कुणाची वर्णी लागते याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.  

खरं तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला क्रमांक तीनच्या जागा मिळाल्यानंतर विरोधी पक्ष नेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कुणाच्या पारड्यात वजन टाकणार याबाबत बरीच उत्सुकता आहे. खरं तर गटनेते पदाबाबत पवारांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. पण अखेर अजित पवार यांच्याच नावाला पसंती देत शरद पवारांनी या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच दिलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यातही धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात बरीच रस्सीखेच होती. कारण की, धनंजय मुंडे यांनी गेली पाच वर्ष विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं होतं. त्यामुळे संसदीय कामकाजाचा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. तसंच परळी मतदारसंघात त्यांनी भाजपच्या बड्या नेत्या आणि आपली बहीण पंकजा मुंडे यांना पराभूत करुन दाखवण्याची किमया करत ते पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झाले आहेत. त्यामुळे विधीमंडळ गट नेतेपदासाठी त्यांच्या नावाची बरीच चर्चा होती. 

दुसरीकडे अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून प्रचंड मोठा विजय मिळवत एक विक्रमच आपल्या नावावर केला. राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान अजित पवारांनी मिळवला. त्यामुळे बारामतीच्या जनतेसह राज्यातील त्यांच्या इतर समर्थकांची देखील अशीच इच्छा होती की, अजित पवारांनाच विधीमंडळाचं गटनेते पद मिळावं. याशिवाय गेले पाच वर्ष विधानसभेत सरकारला अनेक प्रश्नांवरुन अजित पवारांनी अडचणीत आणलं होतं. त्यामुळे त्यांच्याही नावाची बरीच चर्चा होती. 

यामुळे गटनेतेपदासाठी नेमकं कुणाच्या नावाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पसंती देणार याबाबत उत्सुकता होती. पण अखेर अजित पवार यांच्याच नावाला पसंती देत शरद पवारांनी हा प्रश्न निकाली काढला. पण असं असलं तरीही राष्ट्रवादी काँग्रेसची नजर ही भाजप-शिवसेनेच्या सत्तास्थापनच्या राजकारणवर देखील असणार आहे. जर या दोन्ही पक्षांमध्ये काही बिनसलंच तर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे आज जरी राष्ट्रवादीने आपल्या विधीमंडळ नेत्याची घोषणा केली तरी पुढील काही दिवस हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तसं जर झालं नाहीच तर मात्र विरोधी पक्ष नेतेपदासाठी धनंजय मुंडे, जयंत पाटील, छगन भुजबळ हे दिग्गज नेते देखील स्पर्धेत असणार आहेत.  

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...