Bullet Train Project | महाराष्ट्रात सत्तारुढ झालेलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आता बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग देण्याचं काम करेल, अशी अपेक्षा आहे. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असणारा मुंबई अहमदाबाद हाय स्पीड ट्रेन प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून संथ गतीने पुढे जात होता. मात्र आता भाजपने समर्थन दिलेलं सरकार सत्तेवर आल्यामुळे हा प्रकल्प वेग घेईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात सुमारे 150 हेक्टर क्षेत्राचं अधिग्रहण करणं गरजेचं आहे. अद्याप या कामाने वेग घेतलेला नाही. केंद्र सरकारच्या समन्वयाने शिंदे सरकारच्या कार्यकाळात या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी 352 किलोमीटर काम गुजरात राज्यात होणार असून दादरा आणि नगर-हवेली परिसरातील कामांनाही आता वेग आला आहे.
या योजनेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 साली उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाचा अंदाजित वेळ वाढवण्यात आला होता. सुरुवातीला हा प्रकल्प 2023 साली पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो 2026 करण्यात आला होता. तीन वर्ष या प्रकल्पाला उशीर होईल, असं गृहित धरण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील कामांची वाट न पाहता गुजरातमध्ये ठरल्याप्रमाणे कामे सुरु कऱण्यात यावीत, असे निर्देश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र आता भाजपच्या पाठिंब्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यामुळे दोन्ही राज्यातील कामे समान वेगाने सुरू राहतील, अशी अपेक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘प्रगती समीक्षा बैठकी’त तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुलेट ट्रेनच्या कामाबाबत सूचना दिल्या होत्या. 2021 हे वर्षं संपण्याअगोदर या प्रकल्पासाठी आवश्यक असणारं भूसंपादन पूर्ण करण्याच्या त्या सूचना होत्या. मात्र त्याबाबत गेल्या अडीच वर्षात काहीच प्रगती झाली नसल्याचं चित्र आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्प ही एक प्रकारचा दांभिक प्रकल्प असून तो काही महाराष्ट्राच्या ‘प्रायोरिटी लिस्ट’वर नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये रेल्वेचं उत्तम नेटवर्क आधीपासूनच आहे. त्यामुळे या प्रकल्पाची काहीच गरज नसून तो शोभेचा प्रकल्प असल्याचं मत व्यक्त कऱण्यात आलं होतं. त्याऐवजी मुंबई ते नागपूर या मार्गावर बुलेट ट्रेनची खरी गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं होतं.
अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेन मार्गाचा विचार करता यासाठी एकूण 1396 हेक्टर जमिनीची गरज आहे. यापैकी 298 हेक्टर जमीन ही महाराष्ट्रातील आहे. गुजरातमध्ये 954 हेक्टर तर दादरा आणि नगर हवेलीत 8 हेक्टर जागेचं अधिग्रहण कऱण्यात येणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.