मुंबई: राज्यात एकीकडे सत्तांतर घडलेलं असताना आता दुसरीकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा (Presidential election) रंग चढू लागला आहे. एनडीएच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना विजयी करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी सुरु केली आहे. अशावेळी राज्यात नुकतंच सत्तेत आलेल्या शिंदे गटाने (Shinde Group) देखील या निवडणुकीविषयी आपली नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. एवढंच नव्हे तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसह (Shiv Sena) राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना देखील खास गळ घातली आहे.
भाजपच्या बलाढ्य पाठिंब्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांचा गट हा एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनाच मतदान करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. तसंच केसरकर यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील आमदार, खासदारांना महिला म्हणून द्रौपदी मुर्मू यांनाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
पाहा दीपक केसरकर पत्रकार परिषदेत काय म्हणाले:
'आता आम्हाला काम करु द्या.. खूप काम करायचं आहे. फक्त अडीच वर्ष आमच्या हातात आहेत. कोरोनाने होरपाळलेल्या लोकांना न्याय द्यायचा आहे. म्हणून राजकारणावर फार बोलण्याची माझी इच्छा नाही.'
'मी आजची जी पत्रकार परिषद घेतली आहे ती राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना मतदान करावं हे आवाहन करण्यासाठी घेतली आहे. आमचे आमदार, खासदार यांना हात जोडून विनंती आहे की, सर्व जण एकत्र या आणि महाराष्ट्रात वेगळा इतिहास घडवा.' अशी गळच दीपक केसरकर यांनी घातली आहे.
'मला एवढंच सांगायचं आहे की, महिला धोरण कोणी पवार साहेबांनी दिलं ना.. महिला राष्ट्रपती होत असताना राष्ट्रवादीच्या सर्व लोकांनी त्यांना मत दिलं पाहिजे की नाही? राष्ट्रीय महिला अध्यक्ष कोणी दिलं काँग्रेसने दिलं ना.. मग एक महिला ज्यावेळी राष्ट्रपती बनते तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा मतदान केलं पाहिजे ना.' दीपक केसरकर यांनी यावेळी म्हटलं आहे.
'तुम्ही कोणतंही लॉजिक धरा.. आदिवासी म्हणून लॉजिक आहेच. महाराष्ट्रात एक वेगळा इतिहास घडवा म्हणून मी म्हणतोय. त्यात काही व्हीप नाहीए. अर्थात त्यांच्या-त्यांच्या लोकांनी हा निर्णय घ्यावा. पण हे घडावं. निदान महाराष्ट्रात तरी घडावं. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आम्हाला वारसा आहे. पण कधी तरी तो वारसा तुम्ही पूर्ण करणार की नाही. एवढीच माझी हाक आहे.' असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं आहे.
'मी शिंदे साहेबांच्या वतीने हे आवाहन करतोय. मी मुख्यमंत्र्यांच्या वतीनेच ही पत्रकार परिषद घेत आहे. महाराष्ट्र विधिमंडळ शिवसेना यांचा मी प्रवक्ता आहे. हा पक्ष आता सत्तेत आहे.' असंही दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
'आम्हाला प्रत्येकाची मतं हवी आहे. जर मातोश्रीवर जायचं झालं तर कोणी तरी येईलच. गडकरी येतील ही काही पक्षाची निवडणूक नाही. ही निवडणूक भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. त्यामुळे मी वेगळा विचार सांगितला फक्त.' असं दीपक केसरकर यावेळी म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.