मुंबई: मातोश्री समोर हनुमान चालिसा म्हणण्यावर ठाम असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अडविण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत. खार परिसरातील घरात आमदार राणा दाम्पत्य थांबले आहेत, या घराबाहेर शिवसैनिकांनी ढेरा टाकला आहे. राणा दाम्पत्य घराबाहेर पडणार असल्याचं समजताच शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या इमारतीकडे जाणारा रस्ता बॅरिकेटस लावून बंद केला होता. मात्र, काहीवेळापूर्वीचशिवसैनिक या बॅरिकेटसवर चढले आणि राणा दाम्पत्याच्या घराच्या दिशेने चाल करून गेले आहेत.
शिवसैनिकांनी मोठा जमाव पोलिसांचा वेढा तोडून आता राणा दाम्पत्याच्या इमारतीच्या बाहेर पोहोचला आहे. याठिकाणी जमून शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. कालपासून शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या इमारतीपासून काही अंतरावर होते. मात्र, आता शिवसैनिकांचा जमाव इमारतीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याला इमारतीमधून बाहेर पडणे शक्य नाही.
शिवसैनिक राणा दाम्पत्याला बाहेर येण्याचे आव्हान देत आहेत. मात्र, अजूनपर्यंत नवनीत राणा किंवा रवी राणा घराबाहेर आलेले नाहीत. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
आज सकाळपासून राणा दाम्पत्य गनिमी काव्याने मातोश्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. त्यामुळे खार परिसरात शिवसैनिकांकडून राणा यांच्या इमारतीमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जात होती. गाड्यांची डिकी उघडून शिवसैनिक प्रत्येक गाडी तपासत होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.