'जो मेरे राम का नही, वो मेरे काम का नही' म्हणत 'त्याने' केला पक्षाला जय महाराष्ट्र

मुंबई
Updated Nov 27, 2019 | 16:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shiv Sena worker quits party: शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करत राज्यात सत्तास्थापन करत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ २८ डिसेंबर रोजी घेत आहेत.

shiv sena activist ramesh solanki quit party twitter uddhav thackeray congress maharashtra vikas aghadi marathi news
'जो मेरे राम का नही, वो मेरे काम का नही' म्हणत शिवसैनिकाचा पक्षाला जय महाराष्ट्र  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • राज्यात आता शिवसेनेच्या नेत्रृत्वात सरकार 
  • उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
  • २८ डिसेंबर रोजी होणार शपथविधी सोहळा

मुंबई: महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली. आता महाराष्ट्र विकास आघाडी राज्यात सत्तास्थापन करत आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सर्वांमुळे सर्वच शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण त्याच दरम्यान एका नाराज शिवसैनिकाने पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

राज्यात सत्तास्थापन होत असताना समसमान वाटपाच्या मागणीवर शिवसेना ठाम होती आणि याच मुद्यावरुन भाजपसोबत तिढा निर्माण झाला. अखेर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. पण काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी करणं एका शिवसैनिकाला पटलं नाही आणि त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रमेश सोलंकी असं या शिवसैनिकाचं नाव आहे. रमेश सोलंकी हे युवा सेनेचे कार्यकर्ते होते.

रमेश सोलंकी यांनी ट्वीट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये सोलंकी म्हणतात, 'मी युवासेना आणि शिवसेनेतील पदाचा राजीनामा देत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्यभाई यांनी मला राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार'.

आपल्या पुढील ट्वीटमध्ये रमेश सोलंकी म्हणतात, "राज्यात सत्तास्थापनेसाठी आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री होत असल्याने अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सत्तास्थापन करण्यासाठी माझ्या आणि पक्षांच्या तत्वांसोबत तडजोड करुन काँग्रेस पक्षासोबत जाणं मला पटत नाही. असं म्हणतात की जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सर्वात प्रथम उंदीर उड्या मारुन पळ काढतात मात्र, मी विजय मिळवला असतानाही पक्ष सोडत आहे".

रमेश सोलंकी यांनी आणखी ट्वीट करत म्हटलं, "जो मेरे श्री राम का नहीं है (Congress) वो मेरे किसी काम का नहीं है".

राज्यात आता महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. उद्धव ठाकरे २८ डिसेंबर रोजी आपल्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक-एक आमदार शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी