संजय राऊत यांनी सांगितले सत्ता स्थापनेचे ५ पर्याय

मुंबई
Updated Nov 04, 2019 | 12:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra government formation: राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर आता सत्ता स्थापनेसाठीचा संघर्ष सुरु आहे. त्यातच शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून नवनवे वक्तव्य केली जात आहेत. 

shiv sena bjp maharashtra government formation sanjay raut saamana politics
संजय राऊत यांनी सांगितले सत्ता स्थापनेचे ५ पर्याय  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • शिवसेना भाजपचा सत्ता संघर्ष 
 • दोन्ही पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम 
 • मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार - संजय राऊत

मुंबई: मुख्यमंत्री कोणाचा होणार या मुद्द्यावरुन शिवसेना-भाजपत सत्ता संघर्ष सुरू आहे. शिवसेना भाजपसोबत सत्ता स्थापन करणार की, राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यासोबत सत्ता स्थापन करणार यावरुन अनेक चर्चा रंगत आहेत. त्याच दरम्यान शिवसेना-भाजप नेते आपले वेगवेगळे दावे करत आहेत. आता याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यात सध्याच्या परिस्थितीत काय घडू शकतं त्याचे पाच पर्याय सांगितले आहेत. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत आली असून यामध्ये त्यांनी भाजपला टोले लगावले आहेत. पाहूयात राज्यात नेमकं काय घडू शकतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

 1. पर्याय पहिला - सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सत्ता स्थापनेचा दावा करु शकतं. भाजपचे १०५ आमदार आहेत आणि आणखी ४० आमदार हवे आहेत. हे शक्य न झाल्यास विश्वासदर्शक ठरावाच्या दरम्यान सरकार कोसळेल. 
 2. दुसरा पर्याय - २०१४ प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देईल. या बदल्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रात आणि अजित पवारांना राज्यात एखादे पद दिले जाईल. पण २०१४ला केलेली ही चूक पुन्हा शरद पवार करतील असं दिसत नाहीये. 
 3. तिसरा पर्याय - विश्वासदर्शक ठरावाच्या दरम्यान भाजप अपयशी झाल्यास दुसरा मोठा पक्ष असलेली शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतरांच्या मदतीने १७०चा आकडा गाठेल. शिवसेना स्वत:चा मुख्यमंत्री बनवेल. 
 4. चौथा पर्याय - शिवसेना-भाजप यांना नाइलाजास्तव एकत्र येत सरकार स्थापन करावं लागेल. भाजपला मुख्यमत्रीपदाची विभागणी करावी लागेल हाच एक उत्तम पर्याय आहे.
 5. पाचवा पर्याय - ईडी, पोलीस, पैसा यांचा धाक धाकवत इतर पक्षाचे आमदार फोडून भाजपला सरकार बनवाव लागेल. 

मुख्यमंत्रीपदावरुन राज्यातील सत्तास्थापना खोळंबली आहे. फडणवीस आधी ठरल्याप्रमाणे शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नाहीयेत. पदांचे समान वाटप होईल असे रेकॉर्डवर बोलल्याचं असतानाही मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली. तसेच पोलीस, सीबीआय, ईडी, आयकर विभागाच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी हालचाली करत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल

 1. भाजप - १०५ 
 2. शिवसेना - ५६ 
 3. राष्ट्रवादी - ५४ 
 4. काँग्रेस - ४४ 
 5. इतर - १३ 
 6. बहुजन विकास आघाडी - ३ 
 7. एमआयएम - २ 
 8. समाजवादी पक्ष - २ 
 9. प्रहार जनशक्ती पक्ष - २ 
 10. मनसे - १ 
 11. स्वाभिमानी पक्ष - १ 
 12. सीपीआय - १ 
 13. जन सुराज्य शक्ती - १ 
 14. क्रांतिकारी शेतकरी पक्ष - १
 15. शेकाप - १ 
 16. राष्ट्रीय समाज पक्ष - १ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी