Uddhav Thackeray: 'बाप चोरणारी अवलाद... अरे स्वत:च्या वडिलांचं तरी नाव लावायचं ना', ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर घणाघाती वार

मुंबई
रोहित गोळे
Updated Oct 06, 2022 | 00:16 IST

Uddhav Thackeray criticized to eknath shinde: शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.

shiv sena chief uddhav thackeray criticized to eknath shinde on father name
shiv sena chief uddhav thackeray criticized to eknath shinde on father name 
थोडं पण कामाचं
  • शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर तुफान टीका
  • 'एकनाथ शिंदे यांनी माझ्या वडिलांचं नाव चोरलं'
  • एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड

Uddhav Thackeray: मुंबई: यंदाचा दसरा हा राजकीय वर्तुळातील सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे. कारण मुंबईत एकाच वेळी दोन-दोन मोठे दसरा मेळावे सुरु आहेत. एकीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा तर दुसरीकडे शिंदे गटाचा दसरा मेळावा. यावेळी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली असून त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 

पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:

'मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं हे मी माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन, शिवरायांच्या साक्षीने सांगतोय. आज जे तुम्ही केलं आहात तेच तर मी तुम्हाला सांगत होतो. अडीच वर्ष तुमची, अडीच वर्ष शिवसेनेची... तेव्हा सांगितलं संभवंही नही..' 

अधिक वाचा:  एकनाथ शिंदे यांचे बीकेसीतील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

'शिवसेना संपवायची.. पण एवढंच नाहीए. तर माणसाची हाव किती असते अरे इतरांना बाजूला तिकीट देऊन तुला आमदार केला, मंत्री केला आता मुख्यमंत्री झाला... तरी आता शिवसेना पक्षप्रमुख व्हायचंय. शिवसेनाप्रमुख म्हणून स्वीकारणार तुम्ही त्याला? आहे लायकी? एक तर स्वत:च्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी अवलाद. अरे स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा होता. की, त्यांना काय वाटेल काय दिवटं कार्ट माझ्या जन्माला आलं. जे माझ्या ऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नाव लावतं. ना स्वत:चे विचार..' 

'शिवसेनाप्रमुख आपल्यासोबत नाहीत. तर त्यांचे फोटो लावून मतं मागायची. आनंद दिघे वीस वर्ष होऊन गेली त्या एकनिष्ठ शिवसैनिकाला जाऊन आजपर्यंत आनंद दिघे कधी आठवले नव्हते. आज आनंद दिघे आठवतायेत यांना. पण दिघे एकनिष्ठ होतो म्हणून जाताना सुद्धा ते भगव्यातून गेले.'

अधिक वाचा: उद्धव ठाकरेंची गर्जना,दसरा मेळावा भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

'मोठमोठे प्रकल्प प्रकल्प गुजरातमध्ये चालले आहेत आणि हे मिंधे सरकार माना खाली घालून बसले आहेत. तो पुष्पा आलेला ना.. त्यात तो म्हणतो ना.. मै झुकेंगा नही साला आणि हे म्हणतात उठेंगा नही साला...' 

'मला वाटतं उद्या परवा यांच्या सरकारची शंभरी भरतेय.. म्हणजे 100 दिवस पूर्ण होतायेत. पण या 100 दिवसात 90 दिवस तर दिल्लीला गेले असतील. नुसतं तिकडे कुर्निसात करायला. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ. पण हे जे महत्त्वाचे विषय आहेत त्यावर बोलायला तयार नाही.' 

अधिक वाचा: दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून शिंदेंवर टीकेचे बाण

'माझं तर आज स्पष्ट मत आहे.. कारण आता देशातील लोकशाही जिवंत राहते की नाही हा सवाल आहे. कारण भाजपचे अध्यक्ष नड्डा येऊन बोलले की, शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. देशात दुसरे कोणते पक्ष शिल्लक राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय. देश हुकूमशाहीकडे चालला आहे. जे-जे देशप्रेमी असतील त्यांनी देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी