...म्हणून Aaditya Thackeray वगळून शिवसेनेच्या 14 आमदारांना व्हिप उल्लंघनाची नोटीस

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 04, 2022 | 21:21 IST

Maharashtra Politics : विश्वासदर्शक ठरावा दरम्यान व्हिपचं पालन न केल्याने शिवसेनेच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • व्हिपचं पालन न केल्याने शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोलावले यांची तक्रार
  • शिवसेनेच्या 14 आमदारांवर कारवाई होणार? 
  • व्हिपचं उल्लंघन केल्याने विधानसभा अध्यक्षांकडे भरत गोलावलेंची तक्रार

मुंबई : एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केली आणि त्यानंतर त्याचा परिणाम म्हणजे मविआ सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे गट-भाजपचं सरकार आलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आज शिंदे सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं होतं. त्यानुसार आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणी घेण्यात आली. विश्वासदर्शक ठरावापूर्वी शिवसेनेचे मुख्य प्रतोद असलेल्या भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान करण्याचा व्हिप काढला होता. मात्र, शिवसेनेच्या 15 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केलं नाही. त्यामुळे आता भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या 14 आमदारांना नोटीस दिल्या आहेत.

विश्वासदर्शक ठरावात व्हीप न पाळल्यामुळे शिवसेनेच्या एकूण 14 आमदारांना नोटीस देण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तक्रारीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नावाचा उल्लेख नाहीये.

हे पण वाचा : सत्ता स्थापन झाली, आता उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं...

...म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं

शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी माहिती दिली की, शिवसेनेच्या 14 आमदारांना व्हिप उल्लंघनाची नोटीस दिली आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेमापोटी आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे.

विधानसभा अध्यक्षांना भरत गोगावले यांनी पाठवलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांच्या नावाचा समावेश नाहीये. आदित्य ठाकरे यांचं नाव वगळल्याने त्यामागे एकनाथ शिंदे गटाची काही रणनीती आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात 3 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवड झाली. भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटातील भरत गोगावले यांना शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून मंजूरी दिली आहे.

हे पण वाचा : एकनाथ शिंदेंचं सर्वसामान्यांना गिफ्ट, केली मोठी घोषणा

तर तिकडे शिवसेनेच्या वतीने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून काढण्यात आलेल्या व्हिपच्या संदर्भात शिवसेनेने कोर्टात धाव घेतली आहे. येत्या 11 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं ते पहावं लागेल. एकनाथ शिंदे गटातील भरत गोगावले हे मुख्य प्रतोद राहणार की शिवसेनेचे सुनील प्रभू यावर कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी