शिवसेनेला आव्हान देणाऱ्या तृप्ती सावंत यांना बाहेरचा रस्ता

मुंबई
पूजा विचारे
Updated Oct 18, 2019 | 12:07 IST

बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व विभागातल्या तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर हकालपट्टी केली.

Trupti sawant
शिवसेनेला आव्हान देणाऱ्या तृप्ती सावंत यांना बाहेरचा रस्ता   |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
  • तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर हकालपट्टी केली.
  • शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे अशी माहिती देण्यात आली आहे. 

भाजपनंतर आता शिवसेनेनंही बंडखोरांना बाहेरचा दाखवायला सुरूवात केली आहे. बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व विभागातल्या तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर हकालपट्टी केली. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे अशी माहिती देण्यात आली आहे. 

तृप्ती सावंत या वांद्रे पूर्व मतदार संघाच्या शिवसेनेच्या माजी आमदार आहेत. शिवसेनेनं वांद्र्यात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावललं आणि मुंबईचे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिलं. त्यामुळे सावंत या नाराज होत्या. शेवटपर्यंत त्यांनी तिकीटासाठी प्रयत्न केले पण उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी शेवटी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत सावंत यांचं मन वळवण्याचं प्रयत्न करण्यात आले होते. पण तरीही त्यांनी अर्ज मागे न घेता प्रचार सुरूच ठेवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर, अपक्ष उमेदवार तृप्ती सावंत, काँग्रेसचे झिशान सिद्दीकी मैदानात आहेत.

तृप्ती सावंत या दिवगंत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. 2009 साली शिवसेनेनं हा मतदार संघ जिंकला होता. 2015 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यावेळी शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा पराभव केला होता. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांना 52711 मतं तर नारायण राणे यांना 33703 मतं मिळाली होती. एमआयएमच्या रहेबर सिराज खान यांना 15050 मतं मिळाली होती.

भाजप शिवसेना युतीमुळे निवडणुकीत जागावाटपाच्या गणितामुळे अनेक ठिकाणी जागांची अदलाबदल झाली. दोन्ही पक्षातल्या इच्छुकांनी सुमारे पाऊणसे मतदारसंघात बंडाचं निशाण उगारलं. नाशिकमध्येही 36 नगरसेवकांसह 350 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांचीही पक्षातून तातडीनं हकालपट्टी करण्यात आली होती. शिवसेनेनं मंगळवारी नांदेड, हदगाव, चंदगड, बुलडाणा आदी 14 विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोर करणाऱ्या 19 शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी