Exclusive: शिवसेनेने मिळवली मोठी खाती, खातेवाटप जवळपास निश्चित: सूत्र   

मुंबई
रोहित गोळे
Updated Dec 11, 2019 | 11:33 IST

Power Sharing: राज्यातील मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचं चिन्ह आता दिसत आहेत. पाहा कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार

shiv sena has acquired large portfolio almost certainly a formula for power sharing sources 
Exclusive: शिवसेनेने मिळवली मोठी खाती, खातेवाटप जवळपास निश्चित: सूत्र     |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • नव्या सरकारमधील खातेवाटप जवळपास निश्चित
 • शिवसेनेला गृह, नगरविकास खाती मिळविण्यात यश
 • राष्ट्रवादीला अर्थ आणि गृहनिर्माण मिळण्याची शक्यता

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येऊन आता साधारण १२ दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्याचा नेमका कारभार चालणार तरी कसा? असा प्रश्न आता नव्या सरकारला विचारण्यात येत आहे. पण आता याबाबतचा तिढा लवकरच सुटणार असल्याचं समजतं आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असल्याने मंत्रिपदावरुन तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. पण आता यावर तोडगा काढण्यात तीनही पक्षांना यश आल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महत्त्वाच्या खात्यांवरुन तीनही पक्षांमध्ये बरीच चर्चा सुरु आहे. पण आता महत्त्वाच्या पदांची विभागणी झाली असल्याचं समजतं आहे. पाहा कोणत्या पक्षाला कोणती मंत्रिपदं मिळणार 

शिवसेना: 

 1. गृह खातं 
 2. नगरविकास
 3. परिवहन
 4. उद्योग 
 5. पर्यावरण 
 6. सामाजिक न्याय
 7. उच्च आणि तंत्रशिक्षण 

राष्ट्रवादी काँग्रेस: 

 1. अर्थ खातं 
 2. गृहनिर्माण 
 3. कृषी
 4. सहकार
 5. सार्वजनिक बांधकाम 
 6. सार्वजनिक आरोग्य 

काँग्रेस: 

 1. उर्जा खातं 
 2. जलसंपदा 
 3. महसूल 
 4. आदिवासी विकास 
 5. महिला व बालकल्याण 
 6. शालेय, वैद्यकीय शिक्षण 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गृह, गृह निर्माण आणि नगर विकास या खात्यांवरून रस्सीखेच सुरू होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह आणि नगरविकास हे खाते शिवसेनेकडे राखण्यात यश मिळवले आहे. तर अर्थ आणि गृह निर्माण हे खाते राष्ट्रवादीकडे देण्यात आली आहेत. 

आता पुढील काही तासात या खाते वाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी खात्यांना मंत्री मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता मुख्यमंत्री आणि इतर सहा मंत्र्यांकडे खाते दिली जातील. अधिवेशन काळात जी काही प्रश्न विचारली जातील त्याची उत्तरे हे सहा मंत्री देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर येत्या २३ किंवा २४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  त्यानंतर या सहा मंत्र्यांकडील पदभार कमी करण्यात येऊन इतर मंत्र्यांकडे मंत्रीपदे देण्यात येतील

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी