'राज्यपालांच्या 'तशा' वागण्याने पवारांनाही वाटलं आश्चर्य'

मुंबई
रोहित गोळे
Reported by टाइम्स नाऊ मराठी
Updated Jan 06, 2020 | 10:15 IST

Saamana Editorial: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामुळे खातेवाटपास एक दिवसांचा उशीर झाला आणि त्यांच्या या वागण्याचं शरद पवारांना देखील आश्चर्य वाटलं असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

shiv sena has lashed out at governor bhagatsingh koshiyari in saamana editorial 
'राज्यपालांच्या 'तशा' वागण्याने पवारांनाही वाटलं आश्चर्य'  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • खातेवाटपाच्या यादीवर उशीरा स्वाक्षरी केल्याने शिवसेनेची राज्यपालांवर टीका
  • राज्यपालांच्या वागण्याचं शरद पवारांनाही आश्चर्य वाटलं!
  • अग्रलेखात शिवसेनची देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका

मुंबई: महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा घोळ निस्तरल्यानंतर खातेवाटप कधी होणार? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. अखेर काल (रविवार) राज्यपालांच्या मंजुरीनंतर खातेवाटप करण्यात आलं. पण याबाबत आता शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांच्या दिरंगाईमुळे खातेवाटपाला एक दिवस आणखी उशीर झाला असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. तसंच 'राज्यपाल फडणवीस व अजित पवार यांना शपथ देण्यासाठी रात्रभर राजभवन उघडे ठेवतात व स्वतःही जागतात, त्या राज्यपालांनी विस्ताराच्या प्रस्तावावर सही केली नाही व विश्रांतीसाठी निघून गेले याचे आश्चर्य शरद पवारांना वाटणे साहजिकच आहे.' असं म्हणत सामनातून राज्यपालांवर बोचरी टीका करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. मात्र, शनिवारी रात्री त्यांनी या यादीवर सही केलीच नाही. याबाबत जेव्हा राज्यपालांच्या कार्यालयाशी संपर्क साधला गेला त्यावेळी राज्यपाल कार्यालयात उपलब्ध नसल्याने त्यांची स्वाक्षरी होऊ न शकल्याचं सांगण्यात आलं. याच गोष्टीवरुन सामनातून टीका करण्यात आली आहे. 

पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे: 

  • खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली, पण राज्यपालांची झोपण्याची म्हणजे विश्रांतीची वेळ झाल्याने ते खातेवाटपाच्या प्रस्तावावर सही करू शकले नाहीत. शेवटी रविवारच्या रामप्रहरी राज्यपालांच्या सहीशिक्क्याने मंत्र्यांना खातेवाटप झाले आहे. राज्यपालांनी एक दिवसाचा विलंब केला म्हणून अनेकांनी भिवया उंचावल्या आहेत. 
  • जे राज्यपाल देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना शपथ देण्यासाठी रात्रभर राजभवन उघडे ठेवतात व स्वतःही जागतात, त्या राज्यपालांनी विस्ताराच्या प्रस्तावावर सही केली नाही व विश्रांतीसाठी निघून गेले याचे आश्चर्य शरद पवारांना वाटणे साहजिकच आहे. 
  • राज्यपालांनी आणखी एक-दोन दिवस वेळ काढला असता तर बरे झाले असते असे विरोधी पक्षाला वाटत असले तरी रविवारच्या रामप्रहरी राज्यपालांनी सही करून मंत्र्यांना कामे वाटून दिली आहेत.
  • 'आमच्याकडे गृहखाते कुणी घ्यायलाच तयार नाही, गृहखाते नको असे सांगणारेच जास्त आहेत' अशी माहिती खुद्द शरद पवार यांनीच दोन-तीन दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे गृहखाते अनिल देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय? गृहखाते हे जोखमीचे काम आहे. गेल्या काही वर्षांत ते आर.आर. पाटील, जयंत पाटील, भुजबळ वगैरे मंडळींनी सांभाळले.
  • भाजप राजवटीत गृहखात्याची नंगी तलवार हातात घेऊनच मुख्यमंत्री फडणवीस फिरत होते, पण शेवटी या तलवारीनेच त्यांचा घात केला. हाती गृहखाते असूनही महाराष्ट्रात अनेक आंदोलने व संघर्ष पेटले. भीमा-कोरेगाव प्रकरणात राज्याचे गृहखाते हतबल झाल्याचे दिसले, पण विरोधकांचा काटा काढण्यात ते तत्पर ठरले. 
  • मंत्रीपदे व खातेवाटप हे एकप्रकारे 'बक्षिसी' व तडजोडीचेच उद्योग असतात. ते पूर्ण झाले आहेत. राज्यपालांनी रामप्रहरी सही केली. आता 'रामराज्य' येईल अशी मराठी जनतेची अपेक्षा आहे. ती पूर्ण होऊ द्या इतकेच!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी