सर्व खात्यांचा बाप असलेलं पद शिवसेनेकडे आहे: संजय राऊत

मुंबई
रोहित गोळे
Updated Jan 05, 2020 | 16:13 IST

Sanjay Raut: राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांना मात्र, अनेक मुद्द्यांवरुन चिमटे काढले आहेत.

shiv sena has the most important chief minister post sanjay raut said
सर्व खात्यांचा बाप असलेलं पद शिवसेनेकडे आहे: संजय राऊत  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • शिवसेनेकडे सर्व खात्यांचा बाप असलेलं मुख्यमंत्री पद आहे: राऊत
  • भाजपचं ऑपरेशन लोट्स हे यशस्वी होणार नाही, संजय राऊतांना विश्वास
  • भाजप सत्ता गमावल्याच्या धक्क्यातून अद्यापही बाहेर आलेलं नाही!

मुंबई: महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर भाष्य केलं. खातेवाटपानंतर शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा कमी महत्त्वाची खाती मिळाली असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याचबाबत बोलताना ते असंही म्हणाले की, 'शिवसेनेकडे सर्व खात्यांचा बाप असलेलं मुख्यमंत्री पद आहे. कारण खातं कोणतंही असलं तरी अंतिम परवानगी ही मुख्यमंत्र्यांचीच असते.' असं म्हणत शिवसेनाच या सरकारमध्ये वरचढ असल्याचं राऊतांनी सांगितलं. 

याचवेळी बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. 'विरोधकांकडून कितीही ऑपरेशन्स झाली तरीही त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे विरोधकांनी कितीही ऑपरेशन्स करु दे, पण त्याचं एकही ऑपरेशन यशस्वी होणार नाही. मी आधीही म्हटलं होतं की, आमच्याकडे १७० आकडा, जो विधानसभेत आपल्याला दिसला. मी तेव्हाच म्हटलं होतं की, हे सरकार पूर्ण पाच वर्ष टिकेल. ज्यावर मी ठाम आहे. त्यामुळे भाजपकडून फक्त जनतेचं मनोरंजन सुरु आहे. मी आत्ताच सांगतो की, आमचे मासे गळाला आणि आमच्या ऊसाला त्यांचा कोल्हा लागणार नाही.' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 

'भाजप विरोधी पक्ष असला तरीही ते काही आमचे शत्रू नाहीत. विरोधी पक्षातील अनेकांशी आमची चर्चा होत असते. पूर्वी देखील व्हायची. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी. हा महाराष्ट्र आहे.' असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला काहीसा चुचकारण्याचा प्रयत्न देखील केला. 

'भाजपने सत्ता गमावल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. हा धक्का भूकंपचा आहे. त्यामुळे त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना बराच वेळ लागणार आहे. त्याने अनेक नेते हे निराशेच्या गर्तेत अडकले आहेत. त्यामुळे त्यांना काउंसलिंगची गरज आहे. जर गरज असेल तर भाजपच्या नेत्यांना मी काउंसलिंग करण्यास तयार आहे. मला असं वाटतं की, आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सकारात्मक विचार करुन काम केलं पाहिजे.' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला बरेच चिमटेही काढले.  

दरम्यान, याचवेळी अब्दुल सत्तार यांच्या नाराजी नाट्यावर देखील राऊतांनी प्रतिक्रिया दिली. 'अब्दुल सत्तार हे आधी काँग्रेसमध्ये होते ते आता शिवसेनेत आले आहेत. ते एके दिवशी मातोश्रीवर आले आणि शिवबंधन हाती बांधलं एवढंच मला माहिती. त्यामुळे जर चंद्रकांत खैरे हे जर त्यांच्याविषयी काही बोलत असतील तर त्यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे या विचाराचा मी आहे. कारण एखाद्या नेत्याने जिल्ह्यातील एखादी निवडणूक दगा फटक्याने गमावली तर त्याला निश्चितच त्रास होतो.' असं म्हणत राऊत यांनी एकाप्रकारे सत्तारांनाच सुनावलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी