शिवसेना- राष्ट्रवादीत खलबतं, पवारांसोबत राऊत यांची 10 मिनिटं सदिच्छा भेट

मुंबई
पूजा विचारे
Updated Nov 06, 2019 | 12:49 IST

संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. संजय राऊत यांनी पवारांचं निवासस्थान सिल्व्हर ओकवर जाऊन ही भेट घेतली. अवघ्या दहा मिनिटांत राऊत पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडले.

Sanjay Raut Pawar's House
पवारांसोबत 10 मिनिटं सदिच्छा भेटीनंतर राऊत मातोश्रीकडे रवाना  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • राज्यात सत्तास्थापनेवरून अजूनही पेच सुटताना दिसत नाही आहे.
  • . शिवसेना खासदार संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. 
  • संजय राऊत यांनी पवारांचं निवासस्थान सिल्व्हर ओकवर जाऊन ही भेट घेतली.

राज्यात सत्तास्थापनेवरून अजूनही पेच सुटताना दिसत नाही आहे. त्यातच आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे भाजप मुख्यमंत्रीपदावरी चर्चा करण्यासाठी भाजप तयार असताना, सकाळी शिवसेनेनं आपली भूमिका मांडली. कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव येणार नाही किंवा जाणार नसल्याचं ठाम मत शिवसेनेनं मांडलं. त्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना- राष्ट्रवादीत खलबतं सुरू आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. 

संजय राऊत यांनी पवारांचं निवासस्थान सिल्व्हर ओकवर जाऊन ही भेट घेतली. अवघ्या दहा मिनिटांत राऊत पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. यावेळी पवार विरोधी पक्षात बसण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. राजकीय स्थितीवर पवारांनी चिंता व्यक्त केली असून लवकर सरकार स्थापन करा, असं पवारांनी म्हटल्याचं राऊतांनी सांगितलं. 

 

 

शरद पवार साहेबांना भेटलो, नेहमीप्रमाणे ही सदिच्छा भेट होती. राज्यातल्या अस्थिर परिस्थितीवर पवारांनी चिंता व्यक्त केली. जनतेनं काँग्रेस- राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा कौल दिल्यामुळे आपण विरोधी बाकावर बसणार असल्याचं पवारांनी सांगितल्याचं राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. पवारांची भेट घेतल्यानंतर राऊत यांनी थेट मातोश्री गाठलं आहे.

 

 

एका आठवड्यात राऊत यांची पवारांसोबतची दुसरी भेट होती. राऊत यांनी गेल्या 31 ऑक्टोबरला पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यावेळी राऊतांनी सांगितलं होतं. 

 

 

शिवसेना कोणत्याही प्रकारची तडजोडीला तयार नाही

आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राऊत यांनी शिवसेना कोणत्याही प्रकारची तडजोडीला तयार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचंही राऊत यांनी म्हटलं. राज्यात शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. मंगळवारी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यात गेले होते. तसंच आदित्य ठाकरेंनी देखील ओला दुष्काळाचा दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी आणि कष्टकरी शिवसेनेकडे आशेने पाहत आहेत. काहीही झालं तरीही चालेल मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी