'भाजपने सोनू सूदला प्यादे म्हणून वापरले?' राऊतांच्या प्रश्नावर राम कदम म्हणाले...

लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी अभिनेता सोनू सूद याने मदत केली. विविध बसेसच्या माध्यमातून सोनू सूदने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले. मात्र, आता यावरुन राजकीय वातावरण तापले

shiv sena leader sanjay raut slams sonu sood over helping migrant workers 
'भाजपने सोनू सूदला प्यादे म्हणून वापरले?' संजय राऊतांचा सवाल 

थोडं पण कामाचं

  • सोनू सूदने केलेल्या मदतीवर प्रश्न उपस्थित
  • शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या संपादकीयत मांडलं मत
  • भाजप नेते राम कदम यांचे संजय राऊत यांना प्रत्तुत्तर 

मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी अभिनेता सोनू सूद याने मदतीचा हात पुढे केला. मात्र, सोनू सूद याने केलेले मदतकार्य आयोजित असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पाहूयात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या संपादकीयमध्ये काय म्हटलं आहे.

सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे 

इतक्या झपाट्याने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते?

लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या परराज्यातील घरी पोहोचवले. याचा अर्थ म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल राज्याच्या राज्यपालांनी महात्मा सूद याला शाब्बासकी दिली.

आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याचे नाव जोडावे लागेल 

महाराष्ट्र राज्याला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुले ते बाबा आमटे. या नावांमध्ये आता आणखी एका महान सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव जोडावे लागेल ते म्हणजे सोनू सूद. उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, दिल्ली येथे जाण्यास इच्छूक असलेल्या लाखो मजुरांसाठी सोनू सूद म्हणजे देवदूताप्रमाणे अवतरला. त्याने हजारो मजुरांना अलगद आपल्या घरी सुरक्षित पोहोचवले. सरकार मजुरांना पोहोचवण्यात अपयशी ठरले, पण सोनू सारखे नवे महात्मा किती सहजतेने मजुरांना मदत करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांत सुरू झाला.

यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे कसे करु शकेल?

केरळमध्ये ओडिशाच्या १७७ मुली अडकून पडल्या होत्या. त्यांना सोनू सूद याने एका खास विमानाने भुवनेश्वरला पोहोचवले. विमानाची व्यवस्था होत नव्हती, तेव्हा बंगळुरूवरुन एक खास विमान कोच्चीला आणले आणि तेथून सर्व मुलींची रवानगी ओडिशाला केली. एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

सोनू सूदला प्यादे म्हणून वापरले काय? 

कोरोनाच्या काळात भाजप अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप जनतेच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरुन मोदी सरकारविरुद्ध देशभरात असंतोष पेटला तर भाजपने राज्यात ठाकरे सरकारला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूद याला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय? 

सोनू सूदकडे कोणती यंत्रणा?

सोनू सूद याच्याकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना घरपोच पाठवण्याची व्यवस्था करू शकतो? या सर्व यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. हा फक्त एक चेहरा आहे.

भाजपचा स्टार प्रचारक म्हणून फिरताना दिसणार 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी मजुरांना इतक्यात पाठवू नका असे म्हटले होते तर उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणालाही राज्यात घेण्यास तयार नव्हते. मग हे मजूर नक्की पोहोचले कोठे? सोनू सूद या महात्म्याचे नाव आता पंतप्रधान मोदींच्या एखाद्या मन की बात मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस जातील. एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून दिल्ली, मुंभई, उत्तरप्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील असंही सामनामध्ये म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये सोनू सूद बाबत लिहिल्यावर त्यावर भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राम कदम यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत यावर भाष्य केलं आहे.

राम कदम यांनी म्हटलं, "संपूर्ण महाराष्ट्रात हॉस्पिटलमध्ये जागा नाही? म्हणून लोक घरी तडफडून मरत आहेत? प्रत्येक घराघरात उपासमार सुरू आहे? मात्र तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही दुसरे करतात त्यांना तरी करू द्या. स्वत:ही करायचं नाही आणि सोनू सूद सारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत असतील त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर टीका? हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म?".

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी