मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांमुळे राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळलं. त्यानंतर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेनेच्या (Shiv Sena) तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केली आणि आतापर्यंतची ही सर्वात मोठी बंडखोरी ठरली आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) हे सातत्याने बंडखोरांवर निशाणा साधताना दिसून येत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी एक ट्विट करत बंडखोरांना सणसणीत टोला लगावला आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक अस्वल दिसून येत आहे. हा अस्वल आरशासमोर येताच तो आरशात पाहून गोंधळून जातो. त्यानंतर आरशाच्या मागे-पुढे होऊन पाहू लागतो. आरशात पाहून तो इतका गोंधळून जातो की नेमकं काय सुरू आहे हे त्याला कळतंच नाही. हा व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "जेव्हा स्वत:ला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते". संजय राऊतांनी हे ट्विट करत बंडखोरांवर निशाणा साधला आहे.
जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते.. https://t.co/bAPoUgzad1 — Sanjay Raut (@rautsanjay61) July 10, 2022
सामनाच्या रोखठोक सत्रातही संजय राऊत यांनी राज्यातील सत्तांतरावर लिहिले आहे. रोखठोकमध्ये लिहिलं, "महाराष्ट्रात सरळ - सरळ महाभारत घडले. एकाच घरातील लोक एकमेकांसमोर युद्धासाठी उभे आहेत हे खरे, पण येथे कोणी भीष्म, कृपाचार्य आणि द्रोणाचार्य दिसत नाहीत. हरुन-अल-रशीद यांचे पात्र महाभारतात नव्याने उदयास आले इतकेच."
हे पण वाचा : भाजप आमदाराच्या घराबाहेर सापडली सोने-चांदी, पैसे असलेली बॅग
एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत बंड केलं, त्याच्यासोबत भाजपचा काही संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले आणि आता अमृता फडणवीस यांनीच घरातील गुपित फोडले. या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करुन शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत. काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करुन ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा असंही रोखठोकमध्ये म्हटलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.