शिवसेनेचे 'शिलेदार' राखणार 'आमदार', दगा होऊ नये म्हणून 'अशी' सुरक्षा पुरवणार!

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 07, 2019 | 12:38 IST

राजकीय घोडेबाजारात आपले आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांची सोय ही थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच केली आहे. तसंच या आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

shiv sena legislator fears split move all mlas to an trident hotel
शिवसेनेचे 'शिलेदार' राखणार 'आमदार', दगा होऊ नये म्हणून 'अशी' सुरक्षा पुरवणार!  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आमदारा फुटू नये म्हणून शिवसेनेनी केली व्यूहरचना
  • शिवसेनेच्या सर्व आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये व्यवस्था
  • आमदारांसोबत विभागप्रमुख, शाखाप्रमुखही राहणार!

मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडी आता जोरदारपणे सुरु झाल्या आहेत. कारण भाजप आज (गुरुवार) सत्ता स्थापनेचा दावा करण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी भाजपकडून कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे. अशावेळी आमदार फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं अशी भीती शिवसेनेला आहे. त्यामुळेच शिवसेनेने आपल्या आमदारांची विशेष सोय करुन त्यांना खास सुरक्षा देखील पुरवली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालच शिवसेनेकडून मुंबईतील ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमधील ४० खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या 'मातोश्री'वरील बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना ट्रायडेंटमध्ये ठेवण्यात येणार आहे. दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेने आपले आमदार राखण्यासाठी एक खास सुरुक्षा व्यवस्था देखील केली असल्याचं समजतं आहे. 

ट्रायडेंटमधील एका खोलीत दोन आमदार राहणार आहेत. पण इथे हे आमदार एकटेच राहणार नाहीत. त्यासाठी शिवसेनेने आपल्या इतर कार्यकर्त्यांवर देखील मोठी जबाबदारी सोपावली आहे. आमदारांच्या संरक्षणासाठी एक विशेष रचना सेनेकडून करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक आमदारामागे मुंबईतील शिवसेनेचा एक विभागप्रमुख आणि एक शाखाप्रमुख असणार आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारावर डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवण्याचं काम हे विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखावर असणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या शिलेदारांवर आपलेच आमदार राखण्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

कर्नाटक आणि गोवा या राज्यात भाजपने बहुमत नसताना देखील सत्ता स्थापन केली. तसंच इथे मोठ्या प्रमाणात आमदार फोडाफोडीचं राजकारण देखील घडलं. अशावेळी भाजपकडून महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो अशी भीती सध्या सर्वच पक्षांना असल्याने आता आपआपले आमदार जपण्याचं आव्हान प्रत्येक पक्षासमोर असणार आहे. 

दरम्यान, आमदारांचा सर्व खर्च हा पक्षाकडून करण्यात येणार आहे. सत्तास्थापनेच्या दृष्टीने घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामुळेच शिवसेनेने सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे. पण असं असलं तरीही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र, हे वृत्त फेटाळून लावलं आहे. 'शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न कुणीही करु शकत नाही. त्यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्यांनी आपल्या आमदारांना सांभाळावं.' असं राऊत म्हणाले. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी