मुंबई: राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने हालचाली अधिक जोरदार केल्या असल्याचं दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांना शुक्रवारी मुंबईत बोलवलं आहे. तसेच मुंबईत येताना आपल्यासोबत पाच दिवसांसाठीचे कपडे, आधारकार्ड, पॅनकार्ड येऊन या असे आदेशच सर्व आमदारांना देण्यात आले असल्याचं वृत्त समोर येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी म्हणजे २२ नोव्हेंबर रोजी आपल्या सर्व आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही बैठक होणार आहे. सर्व आमदारांना आपले पाच दिवसांसाठीचे कपडे आणि ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड) येऊन येण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कारण, जर येत्या काळात राज्यपालांसमोर आमदारांची ओळख परेड झाली तर त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड हे महत्वाचे कागदपत्र लागतील. त्यामुळेच शिवसेनेच्या सर्व आमदारांना हे आदेश देण्यात आल्याचं वृत्त आहे.
आमदारांच्या बोलावलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे हे सर्व आमदारांसोबत सध्याची राजकीय स्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यावर चर्चा होणार असल्याचं वृत्त आहे. तसेच शेतकऱ्यांचे पंचनामे आणि त्यांना मदत देण्याबाबतची माहिती आमदारांकडून मागितली जाणार आहे.
भाजपसोबत मुख्यमंत्रिपद आणि समसमान जागावाटप यावरुन निर्माण झालेल्या तिढ्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. तसेच सत्तास्थापनेसाठी चर्चाही सुरु केली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत किमान समान कार्यक्रमाचा मसूदा तयार केला. या मसूद्यावर लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. आता शिवसेना आमदारांना पाच दिवसांसाठी लागणारे कपडे घेऊन येण्याचे आदेश दिल्याने लवकरच सत्तास्थापनेचा तिढा सुटेल असं चित्र दिसत आहे.