शिवसेनेच्या आमदारांची घरवापसी, दोन परतले पण एकाला रोखले, काय घडलं त्या रात्री? वाचा

मुंबई
सुनिल देसले
Updated Jun 22, 2022 | 21:05 IST

Rebel Shiv Sena leader Eknath Shinde group vs Uddhav Thackeray : शिवसेनेत आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटातून दोन आमदार पुन्हा महाराष्ट्रात परतले आणि त्यानंतर त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

Shiv Sena mla ghar vapasi two return in Maharashtra but one mla caught by police read shocking information reveals
शिवसेनेच्या आमदारांची घरवापसी, दोन परतले पण एकाला रोखले, काय घडलं त्या रात्री? वाचा 
थोडं पण कामाचं
  • आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं, भाजपने शिंदे साहेबांना हाताशी धरुन काही तरी षडयंत्र रचलं हे स्पष्ट झालं. मला काही तरी गडबड वाटली आणि मी म्हटलं साहेब मला इथून बाहेर जायचं आहे.
  • मला घेऊन जाण्यासाठी गाडी येणार हे पोलिसांच्या लक्षात येताच मला पोलिसांनी जबरदस्तीने लाल रंगाच्या गाडीत टाकून सरकारी दवाखान्यात नेलं असंही आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) मधील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्यासोबत शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड करत सुरत गाठलं. त्यानंतर हे सर्व आमदार गुवाहाटीत पोहोचले. आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. पुन्हा भाजप (BJP)सोबत जुळवून घेण्याची विनंती एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) केली आहे. मात्र, त्याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटातील दोन आमदारांनी तेथून निघून महाराष्ट्रात परतले. महाराष्ट्रात परतलेल्या या दोन आमदारांमध्ये अकोल्याचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) आणि उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांचा समावेश आहे. यापैकी आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यात परतताच धक्कादायक माहिती दिली आहे.

आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं, भाजपने शिंदे साहेबांना हाताशी धरुन काही तरी षडयंत्र रचलं हे स्पष्ट झालं. मला काही तरी गडबड वाटली आणि मी म्हटलं साहेब मला इथून बाहेर जायचं आहे. त्यावेळी पोलिसांनी रोखलं. पोलिसांसोबत वाद झाला आणि मी अक्षरश: पळ काढला. माझ्या मोबाइलची बॅटरी लो झाली होती. कुणासोबतही संपर्क करता येत नव्हता. माझ्या मागे पाच ते सहा पोलिसांच्या गाड्यांचा ताफा होता. मी ज्या लोकेशनवर आहे त्या ठिकाणचा फोटो साहेबांना पाठवला. मग मला घेण्यासाठी साहेबांनी गाडी पाठवली. मला कुठल्याही गाडीत पोलीस बसून देत नव्हते. मला घेऊन जाण्यासाठी गाडी येणार हे पोलिसांच्या लक्षात येताच मला पोलिसांनी जबरदस्तीने लाल रंगाच्या गाडीत टाकून सरकारी दवाखान्यात नेलं.

जबरदस्तीने सरकारी दवाखान्यात नेलं आणि काही पोलिसांनी, डॉक्टरांनी मला ह्रदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं. माझा घातपात करण्याचा त्यांचा बेत असल्याचं माझ्या लक्षात आलं. माझ्या शरीराला इजा पोहचवण्याचा प्रयत्न त्यांचा होता. जवळपास २० जणांनी मला पकडून ठेवलं आणि माझ्या खांद्यावर सुई टोचली. ह्रदयविकाराच्या नावाखाली माझा घातपात करण्याचं षडयंत्र गुजरातच्या सरकारचं होतं. पण मी तेथून सुखरूप निघालो. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं ठरवत मी मवाळ भूमिका घेऊन तेथून त्यांच्यासोबत गुवाहाटीला निघालो. त्यानंतर मी तेथून माझी सुखरुपपणे सुटका करुन महाराष्ट्रात दाखल झालो.

त्या ठिकाणी भाजपचे मोहित कंबोज, संजय कुटे होते. या सर्व प्रकरणात नाव जरी एकनाथ शिंदे यांचं दिसत असेल तरी त्यामागे भाजपचं षडयंत्र आहे. गुवाहाटी येथे असलेल्या आमदारांना माझी विनंती आहे की, आपल्यामागे शिवसेनेचा, उद्धव ठाकरे, बाळासाहेबांचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे आपण निवडून आलो. त्या सर्वांचा आदर करावा आणि मतदारसंघाच्या भविष्याचा विचार करावा अन् पुन्हा परत यावं अशी विनंती मी करतो.

आमदार गेल्याने पक्ष संपत नसतो. पक्ष हा कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो. तिथे असलेल्या आमदारांना मी विनंती करतो की पुन्हा महाराष्ट्रात या. एकीकडे वातावरण निर्माण केलं जातं की, उद्धव ठाकरेंनी काम केली नाहीत आणि दुसरीकडे देशातील चांगलं काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचं नाव येतं. ईडीच्या दबावाखाली महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचं काम भाजप करत आहे असंही आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे.

मी कुठल्याही पेपरवर सही केली नाहीये. ज्याप्रकारे माझी सही दाखवली गेली तशीच इतरांचीही सही दाखवली असावी. अनेक आमदारांना शिवसेनेसोबतच रहायचं आहे. कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर हे माझ्यापूर्वीच पळून गेले होते. ते मला भेटले तेव्हा मी त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की, मी ८० किलोमीटर दूर पळून गेलो होतो पण गुजरात पोलिसांनी मला पकडून पुन्हा आणलं असंही आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी