मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शपथविधीनंतर राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणी घेण्यात आली. या बहुमत चाचणीत शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) बहुमत सिद्ध केलं आहे. शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केल्यावर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून (Shiv Sena mouthpiece Saamana editorial) शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं, बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. शिंद्यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही आणि त्यांच्यासोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत. बंडखोरांचे बोलणे आणि डोलणे काही दिवसांचे आहे. सत्ता आणि संपत्ती यासाठी झालेले बंड ऐतिहासिक तात्विक नसते. बहुमत जिंकले. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे.
हे पण वाचा : 'त्या' घटनेमुळे मुख्यमंत्री शिंदेंना सभागृहात अश्रू अनावर
अग्रलेखात पुढे म्हटलं, संतोष बांगर हे हिंगोलीचे आमदार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले आणि 24 तासांत असे काय घडले की, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हे निष्ठावान शिंदे गटाच्या कॅम्पात शिरले. शिवसेनेत राहिल्याबद्दल या निष्ठावान आमदाराचे हिंगोलीत लोकांनी भव्य स्वागत केले नव्हते. त्यांच्या निष्ठेवर लोकांनी फुले उधळली. आमदार म्हणून विजयी झाले तेव्हाही लोकांनी असे स्वागत केले नव्हते, असे सांगत कपाळाला उटी-चंदन लावलेले बांगर रडू लागले. हेच बांगर सोमवारी शिंदे गटात पळून गेले.
हे पण वाचा : राज्यात मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
सामना अग्रलेखात पुढे म्हटलं, बहुमत चाचणीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार गैरहजर राहिले. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री विधानसभेत पोहोचू शकले नाहीत याचे आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी यशस्वी करणाऱ्या अदृश्य शक्तींचे आभार मानले आहेत. शिंदे हे किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केलं. पण फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? हा प्रश्न आहे. भाजप आणि शिंदे गटाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेतला. हे चोरलेले बहुमत आहे. हा काही राज्याच्या 11 कोटी जनतेचा विश्वास नाही.
देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनाचे भाषण हे सरळ सरळ उसने अवसान असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो असे फडणवीसांनी म्हटले. ज्या प्रकारे ते आले हे त्यांच्या स्वप्नातही नसेल. आधीची अडीच वर्ष ते आलेच नाहीत आणि आताही दिल्लीच्या तडजोडीने ते लंगड्या घोड्यावर बसले. असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलण्यात आला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.