मुंबई आणि ठाण्यात शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत तडजोड करणार?

Maha Vikas Aghadi महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहावे यासाठी शिवसेना पुढील सर्व पालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची शक्यता

Shiv sena ncp congress will fight upcoming elections in coalition
शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत तडजोड करणार? 

थोडं पण कामाचं

  • मुंबई आणि ठाणे मनपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले स्पष्ट संकेत
  • महाविकास आघाडीची २०२२च्या निवडणुकांसाठी तयारी सुरू झाल्याचे चित्र

मुंबईः महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहावे यासाठी शिवसेना मोठा धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. पुढील सर्व पालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी करुन तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. हा धोरणात्मक निर्णय झाल्यास मुंबई आणि ठाणे या दोन्ही महानगरपालिकांसाठी २०२२ मध्ये होणार असलेल्या निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापसांत जागावाटप करुन निवडणूक लढतील. (Shiv sena ncp congress will fight upcoming elections in coalition including mumbai and thane municipal elections)

याआधी २०१७ मध्ये मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे लढली होती. विशेष म्हणजे दोन्ही मनपांमध्ये निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष शिवसेना झाली. पक्षांतर आणि पोटनिवडणुका यामुळे पालिकेतील नगरसेवकांच्या संख्येत थोडे बदल झाले. यंदाचा दसरा मेळावा होईपर्यंत शिवसेनेचे मुंबई मनपात ९७ तर ठाणे मनपात ६७ नगरसेवक झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेला स्वतंत्रपणे निवडणूक लढवून मुंबई आणि ठाणे मनपात एकहाती सत्ता मिळवता आली. पण सत्ता समीकरण सांभाळण्यासाठी शिवसेनेने मुंबई आणि ठाणे या दोन्ही महानगरपालिकांसाठी २०२२ मध्ये होणार असलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी केली आहे. जागावाटपात शिवसेना ही मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल असे चित्र आहे.

शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी मुंबई आणि ठाणे मनपात शिवसेनेच्या नेतृत्वातच सत्तास्थापन होईल, असे सांगितले. मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी, त्याच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी, स्वाभिमानाने शिवसेनेने २०१७ मध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढली होती. पण २०२२ मध्ये सत्ता समीकरण जपण्याकरिता शिवसेनेने मुंबई आणि ठाण्यात मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जागा वाटून घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

कोरोना संकटामुळे अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात येत असल्यामुळे पुढील दीड-दोन वर्षात राज्यात एका मागून एक अनेक निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच शिवसेना धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे.

अलिकडेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरील नाराजीमुळे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले. त्यांनी कोणतेही पद मिळाले नाही तरी पक्ष मोठा करण्यासाठी काम करणार असल्याचे जाहीर केले. खडसे मागील ४० वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. भाजप-शिवसेना युती तुटल्याची घोषणा खडसेंनी २०१४ मध्ये केली होती. या घोषणेनंतर विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष झाला. युतीमध्ये कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेली शिवसेना पहिल्यांदाच दुखावली गेली. पण खडसे आता राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत आणि शिवसेना काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करुन आगामी निवडणुका लढवण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी