"फडणवीसांनी काल शिंदेंकडून माईक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील समजणार नाही" : उद्धव ठाकरे

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 05, 2022 | 16:08 IST

Uddhav Thackeray: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात महिला पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

Shiv Sena party president Uddhav Thackeray takes dig on devendra fadnavis over he snatch mike from cm eknath shinde
"फडणवीसांनी काल शिंदेंकडून माईक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील समजणार नाही" : उद्धव ठाकरे 
थोडं पण कामाचं
  • महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंकडून माईक हिसकावला आता उद्या...

मुंबई : महाराष्ट्रातील मविआ सरकार (Maha Vikas Aghadi) कोसळल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पदाधिकारी, आमदार, नेत्यांच्या बैठकीचा सिलसिला सुरू आहे. अशाच प्रकारे आज मुंबईत महिलापदाधिकाऱ्यांची एक बैठक शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dycm Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हटलं, देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माईक हिसकावला आता उद्या आणकी काय हिसकावतील हे काही लोकांना कळणार सुद्धा नाही. उद्धव ठाकरेंनी असं विधान करत फडणवीसांवर घणाघात केला आहे.

हे पण वाचा : मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का देणार?

मुख्यमंत्री शिंदेंवरही टीका

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता म्हटलं, काल विधानसभेत रिक्षा सुसाट सुटली होता आणि त्याला ब्रेक लागतो की नाही... की कुठे अपघात होतो असं वाटत होतं. एकनाथ शिंदे यांचा प्रवास रिक्षा चालवण्यापासून सुरू झाला होता आणि त्याचाच संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावरुन टोला लगावला आहे.

माईक हिसकावण्याचा प्रकार नेमका काय?

विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन 4 जुलै रोजी पार पडलं. विश्वासदर्शक ठरावात एकनाथ शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर भाषण झालं आणि दोन दिवसीय अधिवेशन स्थगित करण्यात आलं. अधिवेशन संपल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याबाबत प्रश्न विचारला. संतोष बांगर हे शिवसेनेसोबत असताना बहुमत चाचणीवेळी ते थेट शिंदे गटात सहभागी झाले आणि मतदान केलं. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि त्यावर भाष्य केलं. संतोष बांगर हे आता खऱ्या शिवसेनेत आले असं विधान फडणवीसांनी केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी