पटोलेंच्या घोषणेनंतर शिवसेना म्हणते, महाराष्ट्र हितासाठी राष्ट्रवादी- सेनेलाच एकत्र राहावे लागेल

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 17, 2021 | 09:16 IST

एकीकडे काही काळी सवंगडी असलेला भाजप (BJP) पक्ष शिवसेनेवर (ShivSena)शत्रूसारखं लक्ष्य करत आहे. तर दुसरीकडे सत्तेत असलेला मित्र पक्ष काँग्रेसनेही एकाला चलो ला पसंती देऊ केली आहे.

Shiv sena ready to alliance with NCP
महाराष्ट्र हितासाठी राष्ट्रवादी- सेनेलाच एकत्र राहावे लागेल   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत.
  • स्वबळावर सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर करू - नाना पटोले
  • राजकारणात कोण, केव्हा आणि कधी जवळ येईल ते सांगता येत नाही. रावसाहेबांचे हे विधान सोळा आणे सत्य - सामना

मुंबई : एकीकडे काही काळी सवंगडी असलेला भाजप (BJP) पक्ष शिवसेनेवर (ShivSena)शत्रूसारखं लक्ष्य करत आहे. तर दुसरीकडे सत्तेत असलेला मित्र पक्ष काँग्रेसनेही एकाला चलो ला पसंती देऊ केली आहे. यावरुन शिवसेनेने आपल्या मूखपत्राच्या अग्रलेखातून(Editorial) एक सूचक इशारा दिला आहे. “भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष…. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल”, असं आजच्या सामन्यात म्हटलं आहे. 

गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळ दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे. कारणही तसेच आहे, येऊ घातलेल्या निवडणुका, पहिल्यांदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले, त्यात भरीस भर म्हणजे हायकमांडला मान्य असेल तर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार मी होईन, असेही त्यांनी जाहीर केले. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. 

एकत्र लढावं लागेल, पवार-ठाकरेंनी आधीच सूतोवाच केले आहे

स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे.

महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळाचे अजीर्ण झालेले दिसते. कारण जो उठतोय तो उद्याच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. एका बाजूला राज्यात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्दय़ाने जोर धरला आहे. कोल्हापुरात सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. धनगरांना वेळीच आरक्षण मिळाले नाही तर पंढरपुरातील विठोबा माऊलीची महापूजा रोखण्याची भाषा सुरू झाली आहे. ‘ओबीसी’चे पुढारीही रस्त्यांवर उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यात कोरोनाचा धुमाकूळ पूर्णतः थांबलेला नाही. या परिस्थितीतही काही लोकांना राजकारण, निवडणुका, स्वबळाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके ‘ग्रस्त’ असतील असे कधीच वाटले नव्हते.

स्वबळावर सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर करू 

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे एक झुंजार नेते आहेत. त्यांनीही आता आगामी निवडणुका स्वबळावर लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे. स्वबळावर सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर करू, असे त्यांनी आत्मविश्वासाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री कोण, हा संभ्रम त्यांच्या मनात दिसत नाही. मुख्यमंत्री मीच, पक्षाने परवानगी दिली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण बनण्यास तयार असल्याचे विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे 2024 साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाले आहे.

महत्त्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण शेवटी बहुमताचा आकडा महत्त्वाचा

ज्याच्यापाशी145 आमदारांचे बहुमत आहे त्याचे सरकार बनेल व त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे मत नानांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे, तेही खरेच आहे. संसदीय लोकशाही हा बहुमताच्या आकड्यांचा खेळ आहे. हा खेळ ज्याला जमेल तो गादीवर बसेल. राजकारणात इच्छा, महत्त्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण शेवटी बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डोलून काय होणार? ‘मी पुन्हा येईन’ असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. ते आले नाहीत. त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे 105 आमदारांचे बळ वाया गेले आणि तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमत बनवले. त्यामुळे 2024 चा हवाला आता कोणीच देऊ नये.

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो! रावसाहेबांचे हे विधान सोळा आणे सत्य 

नाना पटोले यांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्त्वाचा घटक आहे, पण महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आज तिसऱया स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोलेंनी पक्षातील कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण केला. नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा करताच भाजपचे तालेवार नेते रावसाहेब दानवे यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याची चावी फिरवली. दानवे यांचे म्हणणे आहे की, पुन्हा शिवसेना – भाजप युती शक्यच नाही. त्यामुळे स्वबळावरच लढावे लागेल. दानवे पुढे म्हणतात ते महत्त्वाचे, राजकारणात कोण, केव्हा आणि कधी जवळ येईल ते सांगता येत नाही. रावसाहेबांचे हे विधान सोळा आणे सत्य आहे. 

भाजप बरोबर जाणारा राज्यात कोणाताच पक्ष नाही

दानवे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली हे बरे झाले. दानवे हे केंद्रात मंत्री आहेत. राज्यातील भाजपमध्ये त्यांचे वजन आहे. त्यामुळे दानवे बोलतात ते वायफळ नाही हे मान्यच करावे लागेल. 2024 चे मैदान अद्याप लांब आहे, पण प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा अचानक करू लागले आहेत. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका मुदतीपूर्व लावून घेण्याच्या हालचाली कोणी करत आहे काय? भाजपच्या जवळ जाईल व एकत्र लढतील असा पक्ष महाराष्ट्रात दिसत नाही. त्यामुळे भाजपास स्वबळावर लढणे अपरिहार्य आहे. दानवे यांनी तेच सत्य मांडले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी