शिवसेनेचा दणका, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता, पाहा संपूर्ण यादी 

मुंबई
सुनिल देसले
Updated Oct 16, 2019 | 08:57 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. मतदानासाठी काही दिवस शिल्लक असताना आता शिवसेनेने आपल्या पक्षातील बंडखोरांवर कारवाई केली आहे. शिवसेनेने बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

shiv sena rebel expels check list vidhansabha election 2019 uddhav thackeray politics news
शिवसेनेचा दणका, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता, पाहा संपूर्ण यादी  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

 • शिवसेनेचा बंडखोरांना दणका
 • बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता
 • भाजप नंतर आता शिवसेनेकडून बंडखोरांवर कारवाई

मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात जोरदार इनकमिंग झालं मात्र, त्यानंतर या दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं. बंडखोरांचं बंड थंड करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न झाले मात्र, तरीही काही बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत पक्षांना आव्हान दिलं. त्यानंतर भाजपने पक्षातील बंडखोरांवर कारवाई केली आणि आता शिवसेनेने सुद्धा बंडखोरांना घरचा रस्ता दाखवला आहे.

विधानसभा निवडणुकीत आपला मतदारसंघ भाजपला गेल्यामुळे किंवा उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेतील अनेकांनी बंडखोरी केली. यापैकी काही बंडखोरांवर शिवसेनेने मंगळवारी कारवाई केली आहे. शिवसेनेने पक्षातून १४ विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांवर कारवाई करत घरचा रस्ता दाखवला आहे.

शिवसेनेतून हकालपट्टी झालेले बंडखोर आणि विधानसभा मतदारसंघ 

 1. महेश कोठे - सोलापूर मध्य
 2. मनोज शेजवाळ - मोहोळ 
 3. प्रकाश कौडगे - नांदेड दक्षिण 
 4. कैलास पाटील - चोपडा 
 5. इंदिरा पाटील - चोपडा
 6. बाबुराव कदम - हदगाव 
 7. संतोष माने - गंगापूर  
 8. अण्णासाहेब माने - गंगापूर
 9. डॉ संजय कच्छवे - पाथरी
 10. विशाल होबळे - केज 
 11. सिंधुताई खेडेकर - बुलढाणा 
 12. अर्जुन दांडगे - बुलढाणा
 13. विजयराज शिंदे - बुलढाणा
 14. अनिरुद्ध रेडेकर - चंदगड 
 15. संदीप दबडे - हातकणंगले 
 16. शानाभाऊ सोनवणे - सिंदखेड 
 17. कमलाकर जगदाळे - कोल्हापूर उत्तर
 18. दुर्गेश लिंगराज - कोल्हापूर उत्तर 
 19. राम पाटील - जिंतूर 

शिवसेनेने भलेही या बंडखोरांवर कारवाई केली असेल मात्र, अद्याप असेही काही बंडखोर आहेत ज्यांच्यावर शिवसेनेने कारवाई केलेली नाहीये. यामध्ये मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेने विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे मात्र, त्यांच्या विरोधात तृप्ती सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वर्सोव्यात राजुल पटेल यांनी बंडखोरी केलीय. कल्याण पूर्वमध्ये धनंजय बोडारे, घाटकोपर पश्चिम मतदारसंघात संजय भालेराव यांनी बंडखोरी केलीय. मात्र, या बंडखोरांवर शिवसेनेने अद्याप कारवाई केलेली नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी