मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawale) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील फ्री वेवर हा अपघात झाला आहे. एकूण ८ गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. या अपघातात गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाहीये.
आमदार भरत गोगावले यांनी माहिती दिली की, एक टॅक्सी बिघडलेली होती आणि त्या टॅक्सीला एकामागेएक अशा एकूण आठ गाड्या आदळल्या. आमच्या गाडीपुढे पोलिसांची गाडी होती. त्यानंतर आमची गाडी होती. एकमेकांवर जवळजवळ आठ गाड्या आदळल्या आणि त्यात गाडीचे नुकसान झाले.
Mumbai | आमदार भरत गोगावले यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात#Maharashtra #CarAccident #BharatGogawale pic.twitter.com/A1n7uSPAYx — Timesnowmarathi (@timesnowmarathi) July 11, 2022
ईश्वर कृपेने आम्हाला कुणालाही काहीही दुखापत झालेली नाहीये. त्यामुळे शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी काहीही काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्या सर्वांच्या कृपेने आम्ही सुखरूप आहोत असंही आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आमदार भरत गोगावले हे मंत्रालयाच्या दिशेने निघाले असताना फ्री वेवर हा अपघात झाला आहे. फ्री वेवर वाडीबंदर जवळ हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार भरत गोगावले हे एकनाथ शिंदे गटासोबत आहेत. आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले तेव्हापासून भरत गोगावले हे त्यांच्यासोबतच आहेत. एकनाथ शिंदे गटात सुरुवातीपासून असलेल्या आमदार भरत गोगावले यांना शिंदे गाटचे मुख्य प्रतोद म्हणून जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे.
हे पण वाचा : अस्वलाचा व्हिडिओ ट्विट करुन राऊतांचा बंडखोरांना सणसणीत टोला
आमदार भरत गोगावले हे महाड-माणगाव- पोलादपूर विधानसभेचे आमदार आहेत. शिवसेनेचे मुंबईसह कोकण पट्ट्यात चांगले वर्चस्व आहे. त्याच कोकणातील आमदार भरत गोगावले हे एक मोठे नाव आहे. महाड परिसरात त्यांचे मोठे नाव असून त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. आमदार भरत गोगावले हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला एक मोठा झटका बसला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.