मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं आणि त्यामागे सर्वात मोठं कारण ठरलं तर ते म्हणजे सत्तेत असलेल्या शिवसेनेत झालेली बंडखोरी. शिवसेनेत (Shiv Sena) झालेली ही सर्वात मोठी बंडखोरी झाली आणि त्याचा परिणाम म्हणजे ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेनेत झालेल्या या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही बंडाची कीड लागणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा कार्यक्रमात दावा केला आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड होण्याची शक्यता आहे. आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, कॉलेजचा एक सीआर फोडायला नाकीनऊ येतात. इकडं 40 आमदार एकामागे एक असे धडाधड जातात. सुरुवातीला आम्ही 15-20 आमदार गेलो. पण मग मागची 20 आमदार कसे आले. त्यांना कुणी रिवॉल्वर लावली होती का? साहेब तर आमच्यासोबत होते. एकामागेएक माणसं कशी आली? ही राज्यातील सर्व पक्षांनी विचार करण्याची गोष्ट आहे. आज ही खदखद शिवसेनेत दिसली. ही खदखद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. ही खदखद काँग्रेसमध्ये आहे.
हे पण वाचा : CCTV: आईसोबत गेलेल्या मुलाच्या अंगावर लोखंडी मशीन कोसळली
शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले, नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते. त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे हे मंत्रिपदासाठीच गेले होते. सारखं मंत्रिमंडळाचा विस्तार करा, विस्तार करा म्हणत होते. त्यांना मंत्रिपद हवं होतं. हे जनसेवेची भावना थोडी कमी होत चालली आहे आणि सत्ता मिळवण्याचं प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाला खुर्ची हवी आहे.
शिवसेनेत जे झालं ते इतर पक्षांत होईल का? या प्रश्नावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं, 100 टक्के होऊ शकतं. आज नाही तर उद्या... प्रत्येकाच्या वाट्याला हे येणार. का येणार हे पण मी सांगतो. आज राष्ट्रवादीत सर्व चांगलं आहे असं त्यांना वाटतं. पण त्यांच्या पक्षातही खदखद आहे. त्यांचे आमदार आम्हाला त्यांच्या व्यथा बोलून दाखवतात.
कोरोनामुळे मातोश्री सर्वसामान्यांसाठी अडीच वर्षे बंदच झालं. पाच-सहा कोण जात असतील तर ते आम्हाला माहिती नाही. पण आम्हाला तिकडे परवानगी नाही. दुसरी गोष्ट वर्षा बंगल्यावर जायचं तर मुख्यमंत्री तिकडे नाहीत. मग वर्षा बंगल्यावर जाऊन काय शिपायाला भेटायचं होतं का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नसल्याचं आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.