अखेर स्वत: उद्धव ठाकरेंनी समोर येऊन सांगितलं, राष्ट्रपती पदासाठी आमचा पाठिंबा 'यांनाच'...

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 12, 2022 | 18:29 IST

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला पाठिंबा कोणाला असणार हे आता जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत घोषणा केली आहे.

shiv sena support for draupadi murmu for presidential elections uddhav thackeray announces at press conference
अखेर स्वत: उद्धव ठाकरेंनी समोर येऊन सांगितलं, राष्ट्रपती पदासाठी आमचा पाठिंबा 'यांनाच'...  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना जाहीर केला पाठिंबा
  • द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचं उद्धव ठाकरें केलं स्पष्ट
  • आदिवसी समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या आग्रहाखातर शिवसेना मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचं म्हणाले उद्धव ठाकरे

मुंबई: राष्ट्रपती पदासाठी शिवसेना (Shivsena) नेमकं कोणाला पाठिंबा देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. याबाबत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच उलटसुलट चर्चाही सुरु होत्या. तसेच काल झालेल्या बैठकीत खासदारांनी देखील उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) असंच सुचवलं की, आपण तूर्तास भाजपशी (BJP) जुळवून घ्यावं आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत (Presidental Election) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना आपला पाठिंबा जाहीर करावा. अखेर या सगळ्या घडामोडीनंतर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (१२ जुलै) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 

येत्या काही दिवसातच राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे आणि त्यासाठी शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा देत असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

अधिक वाचा: उद्धव ठाकरेंकडून बांगरांची हकालपट्टी, शिंदेंकडून पुनर्वसन

पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:

'राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता तोंडावर आली आहे. मी मुद्दाम स्वत: आपल्यासमोर यासाठी बोलतोय कारण की काही बातम्या या विचित्र पद्धतीने या आपल्यापर्यंत आल्या आहेत आणि त्या जनतेपर्यंत गेल्या आहेत. पहिल्या प्रथम एक गोष्ट मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो की, काल जी खासदारांची बैठक झाली त्या बैठकीत कोणीही कोणताही दबाव माझ्यावर आणलेला नाही.' असं सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. 

'सर्वांनी सांगितलं की, हा विषय आपला आहे. आपण द्याल तो आदेश. कोणाला पाठिंबा द्यायचा, कोणाला द्यायचा नाही हे तुम्ही जसं सांगाल तसं. आज मी एक भूमिका स्पष्ट करतो आहे. कारण आज सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की, सेना भवन आणि मातोश्रीवर रीघ लागली आहे.' 

अधिक वाचा: राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा

'विशेष म्हणजे गेल्या चार दिवस आदिवासी समाजात काम करणाऱ्या माझ्या शिवसेनेतील शिवसैनिकांनी विनंती केली आहे. त्यामध्ये एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे आहेत. ते शिवसेनेसोबत आहेत. त्यांनी मला विनंती केली आणि त्यांचं पत्र देखील माझ्याकडे आहे. काल आमच्याकडे आमशा पडवी आले होते. ज्यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. असे बरेच लोकं आले होते. ज्यांनी विनंती केली की, पहिल्या प्रथम आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळते आहे. आमच्या समाजाला एक वेगळी ओळख मिळते आहे. तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर सगळ्यांना आनंद होईल.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली. 

'या सगळ्या गोष्टीचा, विनंतीचा आणि जो काही प्रेमाने आग्रह केला मला त्या सगळ्याचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू ताई यांना आपला पाठिंबा देत आहे. पण हा पाठिंबा जाहीर करताना मी पुन्हा सांगतो की, कोणताही दबाव नाही.' अशी जाहीर घोषणा उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे. 

'सध्याचं राजकारण पाहिलं तर मी पाठिंबा द्यायचा ऐवजी विरोध करायला पाहिजे. पण शिवसेनेने कधीच राष्ट्रध्यक्ष पदासाठी कोत्या मनाने विचार केलेला नाही. ज्यावेळेला प्रतिभा ताईंचं नाव आलेलं तेव्हा देखील शिवसेनाप्रमुखांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार केला होता आणि प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता. प्रणव दादांना पण पाठिंबा दिला होता. त्याच परंपरेमध्ये मी या समाजातील जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जो काही आग्रह केला त्याचा आदर करुन शिवसेना राष्ट्रपती द्रौपदीजींना पाठिंबा देत आहे.' असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी