'भाजप-शिवसेनेला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद', पाहा कोणी केला खुलासा

मुंबई
Updated Jun 11, 2019 | 16:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्यात भाजप आणि शिवसेना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेणार असल्याचा दावा आता करण्यात आला आहे. पाहा कोणी केलाय हा दावा...

uddhav thackeray and amit shah_PTI
'भाजप-शिवसेनेला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद', पाहा कोणी केला खुलासा  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई: भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री हवा असा आदेश राज्यातील भाजप नेत्यांना दिल्यानंतर शिवसेना नाराज झाल्याचं वृत्त कालच समोर आलं होतं. आता यानंतर आणखी एक नवी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं जाणार असल्याची. होय.. याबाबत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी याबाबत तसं ट्वीट केलं आहे. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे अगदी जवळचे सहकारी मानले जातात. वरुण यांनी आपल्या ट्वीटमध्ये थेट असं म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा निर्णय झाला आहे. 

वरुण सरदेसाई यांनी नेमकं काय ट्वीट केलं? 
'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला आहे. या बैठकीला जे उपस्थित नव्हते त्यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी युती तोडण्याचा प्रयत्न करु नये.' 


वरुण सरदेसाई यांनी अप्रत्यक्षपणे अनेकांना यावेळी टोला हाणला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशा वेळी आता वरुण सरदेसाई यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता नव्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. कारण सुरुवातीपासून शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं समजतं आहे. पण दुसरीकडे भाजप आपलाच मुख्यमंत्री पुन्हा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे जर अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला असेल तर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा बदलून जाईल. 

काही दिवसांपूर्वीच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप-शिवसेना समान जागा विधानसभेत निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. म्हणजेच शिवसेना १३५ आणि भाजपही १३५ जागा लढवणार असल्याचा दावा पाटलांनी केला होता. तर १८ जागा या मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. पण त्यांच्या याच दाव्यामुळे शिवसेना मात्र नाराज झाली होती.  

२०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी १२३ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण त्यांना बहुमत मिळवता आलं नव्हतं. तर यावेळी शिवसेना दुसऱ्या स्थानी तर काँग्रेस तिसऱ्या स्थानी होती. सुरुवातीला भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला नव्हता. पण त्यानंतर काही दिवसातच भाजपला पाठिंबा देऊन शिवसेना सत्तेत सामील झाली होती. पण असं असलं तरीही वारंवार शिवसेना भाजपला टार्गेट करत होती. पण २०१९ लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेने अचानक भाजपशी युती करत यू-टर्न घेतला होता. त्यामुळे आता लोकसभेसाठी केलेली युती ही विधानसभेसाठी टिकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी