इस्लामपूरः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मोठमोठ्या नेते मंडळींच्या देखील जोरदार प्रचारसभा राज्यभर आयोजित आहेत. नेतेमंडळी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्य पिंजून काढत आहे. त्यातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्लामपूरमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी शेतकरी समस्या आणि कर्जमाफी यामुद्द्यांवर भर दिला. याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेससह बंडखोर आणि अपक्षांवर टीकास्त्र सोडलं आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला शेतीतलं काही कळत नाही आणि ते मला समजूनही घ्यायचं नाही. पण शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू मला दिसतात ते पुरेसे आहते. कर्जमाफी हा शब्द मला पटत नसून मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं आहे. तसंच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात किमान दहा हजार रूपये देण्याचं आश्वासन देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेत दिलं.
यासोबतच उद्धव ठाकरेंनी इस्लामपूर शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी गौरव किरण नायकवडी जी यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन जनतेला केलं.सध्या राज्यभर प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. त्यातच भाजप, शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यातच मनसे यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. शेतकऱ्यांच्या समस्येवर बोलल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बंडखोर आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे वळवला.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, इस्लामपूर ही क्रांतिवीरांची भूमी आहे. हा जिल्हा वसंतदादा यांचा आहे. वसंतदादा यांचं सरकार कोणी पाडलं? वसंतदादांच्या पाठीत वार करून जे स्वतः मुख्यमंत्री झाले, त्यांच्या पक्षाच्या माणसाला तुम्ही आमदार म्हणून निवडून देणार आहात का ? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी जनतेला विचारला. गावोगावी गोरगरिबांसाठी एक रूपयामध्ये प्राथमिक आरोग्य चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. या सरकारनं गेल्या 5 वर्षांत भरपूर चांगली कामं केली आणि ती कामं करताना त्यामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे आणि याचा मला अभिमान आहे, हे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.