मुंबई: शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फुटल्याने उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. तर याच ४० आमदारांच्या जोरावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद पटकावलं. या सगळ्या घडामोडीमुळे शिवसेना पक्ष हा पूर्णपणे ढवळून निघाला असून त्यात उभी फूट पडली आहे. मात्र, असं असताना देखील शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेना १०० हून अधिक जागांवर विजय मिळवेल.
'आम्ही शिवसेना म्हणून १०० च्या वर जागा निवडून आणू. यांची ताकद काय आहे ते आम्हाला कळली आहे. लोकांमध्ये ज्या प्रकारचा उत्साह दिसतो. ज्या प्रकारची चीड दिसतेय ते पाहता महाराष्ट्रात शिवसेना ही १०० च्या वर जागा जिंकेल. असं आज मला वातावरण दिसतंय.' असा दावा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
पाहा संजय राऊत काय म्हणाले:
'उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. ज्यांना पळून जायचं आहे ते काहीही बहाणा शोधून काढतात. ठीक आहे तुम्ही गेला आहात पण आता बहाणे सांगत बसू नका. काम करा.' असं संजय राऊत म्हणाले.
'जे १४ आहेत ते सर्व बाळासाहेबांचेच चेले आणि शिवसैनिक आहेत. मुख्यमंत्री जेव्हा विश्वासदर्शक जेव्हा जिंकतात तेव्हा त्यांना आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. मुळात त्यांनी राज्याची भूमिका न मांडता मी पक्ष का सोडला याच्यावर खुलासे देत होते.' अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे.
'पक्ष सोडणाऱ्या नेत्याला अशा प्रकारे खुलासे करणारं भाषण करावं लागतं. लोकांच्या भावनांना हात घालणारं भाषण करावं लागतं. माझंच कसं बरोबर आहे, माझ्यावर कसा अन्याय झाला हे सतत त्यांना वारंवार सांगावं लागतं. त्या पद्धतीने त्यांनी उत्तम भाषण केलं.' असं संजय राऊत म्हणाले.
अधिक वाचा: "आधीचे अडीच वर्ष ते आलेच नाहीत अन् आताही तडजोडीने लंगड्या घोड्यावर बसले" सामनातून फडणवीसांवर निशाणा
'आम्ही शिवसेना म्हणून 100 च्या वर जागा निवडून आणून. यांची ताकद काय आहे ते आम्हाला कळली आहे. लोकांमध्ये ज्या प्रकारचा उत्साह दिसतो. ज्या प्रकारची चीड दिसतेय ते पाहता महाराष्ट्रात शिवसेना ही १०० च्या वर जागा जिंकेल. असं आज मला वातावरण दिसतंय. कोणी पक्षातून काही आमदार किंवा काही खासदार सोडून गेले किंवा जाणार असतील म्हणून शिवसेनेला मानणारा शिवसैनिक गेला असं होत नाही.' असा दावा अत्यंत आत्मविश्वासाने संजय राऊत यांनी केला आहे.
'तुम्ही बाळासाहेबांच्या स्मारकावर गेलात, शिवाजी महाराजांच्या चरणी लीन झालात तरी सुद्धा इतिहासात तुमची नोंद वेगळ्या पद्धतीने होईल. आपण आपल्या भूमिका पक्षात वेगळ्या पद्धतीने मांडू शकत होतात. आम्ही सगळे वारंवार आपल्याशी चर्चा करत होतो. काही कम्युनिकेशन गॅप राहिली असेल तरीही मार्ग निघत होता.' असंही संजय राऊत म्हणाले.
'आपण जेव्हा बाहेर होतात तेव्हाही आपल्याशी बोलत होते. आम्ही सगळे आमदारांशी बोलत होते. काल एक आमदार तिकडे गेले. मला तर आश्चर्यच वाटत होतं. आदल्या दिवशी रडत होते मतदारसंघात जाऊन. ज्या पद्धतीने लोकांनी त्यांचं हिंगोलीमध्ये स्वागत केलं होतं आणि त्यांच्या अश्रूधारा वाहू लागल्या होत्या. आता अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार?.. गद्दार लोकांना मतदार पुन्हा उभं करणार नाहीत हे मी खात्रीने सांगतो.' असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.
'जर कोणाला फसवून तिकडे नेलं असेल तर आम्हाला अजूनही आशा आहे की, आमदार परत येतील. त्यांचा जो भ्रम आहे तो दूर होईल. आमचेच लोकं आहेत.' असं म्हणत संजय राऊत यांनी आपल्या बंडखोर आमदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.