Maharashtra Politics | शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली असून ते आहे त्याच पदावर पक्षात कार्यरत राहतील, असा खुलासा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. 3 जुलै रोजी सामना या मुखपत्रात छापून आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात आल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला असून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे उपनेते म्हणून कार्यरत असल्याचा खुलासाही करण्यात आला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेचच ती मागे घेण्यात आली होती. मात्र कारवाई मागे घेऊनही त्याबाबतचे वृत्त शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते. यावरून गोंधळ उडाल्यानंतर पक्षाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचा गट फुटून गेल्यानंतर त्या गटासोबत असणाऱ्या किंवा त्या गटाशी सलगी दाखवणाऱ्या नेत्यांची हकालपट्टी करण्याचं धोरण पक्षानं अवलंबलं आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. काहींनी केवळ उपचारांपुरते अभिनंदन केले तर काहींनी शिंदे यांच्याशी असणारी जवळीक अधोरेखित कऱण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावरून शिंदे यांना दिलेल्या शुभेच्छासंदेशावरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
अधिक वाचा - धक्कातंत्राच्या घातक ट्रेंडपासून सावधान
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वतःचा शिंदेंसोबतचा फोटो वापरला होता. मात्र त्या पोस्टरवरून उद्धव ठाकरेंचा फोटो गायब होता. याचा राजकीय वर्तुळात वेगळाच अर्थ काढला गेला आणि शिवाजीराव आढळराव हे शिंदे गटाला सामील असल्याचं समजत त्यांच्यावर कारवाई कऱण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यांच्यावर कारवाई कऱण्यात आल्यावर आपली निष्ठा ठाकरेंसोबत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे लगेचच त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली होती.
कारवाई मागे घेतल्याचा उल्लेख न करता केवळ शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हकालपट्टीची बातमी शिवसेनेच्या अधिकृत मुखपत्रात छापून आल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम प्रसारमाध्यमांतही ही बातमी झळकली होती. त्यामुळे काही तासांतच शिवसेनेला याबाबत खुलासा करावा लागला आहे. शिवसेनेचे सचिव खा. विनायक राऊत यांनी पक्षाच्या अधिकृत लेटरहेडवरून या बाबीचा खुलासा केला असून गैरसमज दूर करण्याचं आवाहन केलं आहे.
अधिक वाचा - उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना मोठा दिलासा
शिवाजीराव आढळऱाव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. 2004 साली ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 2009 आणि 2014 च्या निवडणुकीतही ते खासदार म्हणून निवडून आले. सलग 15 वर्षे खासदार राहण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. त्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे हे त्यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.