मोदी-शहांची ‘हवाबाज’ नीती फोल ठरली, शिवसेनेची दिल्ली निकालानंतर टीका  

मुंबई
रोहित गोळे
Updated Feb 12, 2020 | 12:12 IST

दिल्ली निवडणुकीत भाजपला फार काही चमक दाखवता न आल्याने आता त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर तोंडसुख घेणं सुरु केलं आहे. त्यातच शिवसेनेने आता सामनातून त्यांच्यावर टीका केली आहे.

shivsena again criticized bjp after delhi vidhansabha election defeat  
मोदी-शहांची ‘हवाबाज’ नीती फोल ठरली, शिवसेनेची दिल्ली निकालानंतर टीका  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून भाजपवर पुन्हा एकदा टीका केली आहे. यावेळी अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट टीका करण्यात आली आहे. मोदी-शहा यांची हवाबाज नीती फोल ठरली असल्याचं म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्यावर मात्र, स्तुतीसुमनं उधळली आहेत. 'केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही.' असं म्हणत भाजपला आणखी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

'विधानसभा निवडणुकीत मोदी आणि शहांची ‘हवाबाज’ नीती फोल ठरली. दिल्ली विधानसभेचा निकाल पाहिला तर एकटे केजरीवाल हे संपूर्ण केंद्र सरकार व शक्तिमान भाजपला भारी पडले आहेत.' असं म्हणत शिवसेनेने भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत. दरम्यान, भाजपला दिल्लीसारखं राजधानीचं महत्त्वाचं राज्य मिळवता न आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच भाजपला सत्ता मिळू शकली नाही. त्यातच आता शिवसेनेने दिल्ली निवडणुकीवर भाजपवर टीका करणं सुरु केलं आहे. त्यावर आता राज्यातील भाजपचे नेते शिवसेनेला नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

पाहा सामनातील अग्रलेखात नेमकं काय म्हटलं आहे: 

  • केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली. केजरीवाल यांचा दिल्ली प्रदेश हा केंद्रशासित असल्याने कायदा सुव्यवस्था, पोलीस, उद्योग हे विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाहीत. त्याचा त्यांना फायदाच झाला. 
  • दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ बारा वाजले व त्याचे खापर मोदी-शहांवर फोडण्यात ते यशस्वी झाले, पण पाणी आणि वीज बिल माफीचे संपूर्ण श्रेय त्यांनी घेतले. भाजप हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या ‘आप’चा झाला. ‘आपमतलब्यां’चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळय़ांना साफ केले. केजरीवाल यांचे अभिनंदन!
  • दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा विजय झाला यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षाही दिल्लीची निवडणूक गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिष्ठsची केली होती. जयप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे सूत्रधार अमित शहा हेच होते. पक्षाचे अध्यक्षपद सोडताना त्यांना एक विजय मिळवायचा होता. ते शक्य झाले नाही. झारखंडमध्ये पराभव झाला व ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे गेले. 
  • लोकसभा निवडणुकीतील मोठय़ा विजयानंतर भाजपला एकापाठोपाठ एक राज्ये गमवावी लागली आहेत. चार महिन्यांपूर्वी दिल्लीतील सातपैकी सात लोकसभा जागांवर भाजपचा विजय झाला तो पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा होता. मोदी किंवा भाजपसमोर एखाद्या पक्षाचे किंवा नेत्याचे तगडे आव्हान नव्हते. त्यामुळे भाजपचा एकतर्फी विजय झाला, पण विधानसभा निवडणुकीत एकीकडे राज्यांतील तगडे नेतृत्व आणि त्यांच्यासमोर मोदी आणि शहांची ‘हवाबाज’ नीती फोल असे चित्र निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी