विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा, मुंबई आणि औरंगाबादच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 16, 2022 | 18:52 IST

shivsena claim post of leader of opposition in the legislative assembly a letter written to the deputy speaker : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आपल्या हाती यावे यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे.

shivsena claim post of leader of opposition in the maharashtra legislative council a letter written to the deputy speaker
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा
 • विधान परिषदेच्या पक्षनेते पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता
 • शिवसेनेत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मंत्री अनिल परब, सचिन अहिर आणि अंबादास दानवे ही नावं चर्चेत

shivsena claim post of leader of opposition in the maharashtra legislative council a letter written to the deputy speaker : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० पेक्षा जास्त आमदारांनी महाविकास आघाडीला विरोध केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. कमी आमदार असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद गेले. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आपल्या हाती यावे यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. 

विधान परिषदेत सरकार विरोधात असलेल्या आमदारांपैकी सर्वाधिक आमदार आपल्याकडे असल्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून पत्र पाठविण्यात आले आहे.

विधान परिषदेत शिवसेनेचे बारा तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी दहा आमदार आहेत. यामुळे संख्याबळाचे कारण देत शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. तर विधान परिषदेत सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज आहे. आमच्याकडे एकनाथ खडसेंसारखे सरकारला धारेवर धरू शकणारे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही आम्हालाच मिळावे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. यामुळे विधान परिषदेच्या पक्षनेते पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मंत्री अनिल परब आणि सचिन अहिर या दोघांची नावं आघाडीवर आहेत. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून शिवसेना मुंबईकर चेहऱ्याला संधी देईल, अशी चर्चा आहे. ग्रामीण भागातील शिवसेना आमदार अशी ओळख असलेले अंबादास दानवे हे पण विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असल्याचे समजते. छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) शिवसेना बळकट करण्यासाठी अंबादास दानवे यांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. औरंगाबादचे विधानसभेतील चार आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्यामुळे तिथे शिवसेनेसमोर नव्याने जुळवाजुळव करण्याचे मोठे आव्हान आहे. याच कारणामुळे दानवे यांना विधान परिषदेत शिवसेनेकडून संधी दिली जाईल अशी चर्चा आहे.

महाराष्ट्र : विधान परिषद : कोणत्या पक्षाचे किती संख्याबळ?

 1. भारतीय जनता पार्टी : २४ आमदार
 2. शिवसेना : १२ आमदार
 3. राष्ट्रवादी काँग्रेस : १० आमदार
 4. काँग्रेस : १० आमदार
 5. लोकभारती : १ आमदार
 6. शेतकरी कामगार पक्ष : १ आमदार
 7. राष्ट्रीय समाज पक्ष : १ आमदार
 8. अपक्ष : ४ आमदार
 9. विधान परिषदेच्या १५ जागा रिक्त आहेत. (१२ नामनिर्देशीत आणि ३ स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडून पाठवायच्या प्रतिनिधींच्या जागा रिक्त. सोलापूर, अहमदनगर आणि ठाणे या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाठवायच्या प्रतिनिधींच्या जागा रिक्त.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी