Saamana Editorial : मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी केल्यानंतर भाजपशी घरोबा करून मुख्यमंत्रिपदत मिळवले आहे. त्यानंतर काल शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. भाजपचे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे मनसुबे आहेत यावर शिंदे गट काय करणार? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातून मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला आहे. तसेच मुंबईच्या बाबतीत सध्या दिल्लीचा विचार बरा नाही, मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असाही आरोप आजच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.
अधिक वाचा : धनुष्यबाण ही निशाणी आपलीच.. त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका: उद्धव ठाकरे
सामनाच्या अग्रलेखात आज म्हटले आहे की, मुंबईच्या बाबतीत सध्या दिल्लीचा विचार बरा नाही. मुंबईचे महत्त्व कमी करण्याची एकही संधी सध्या दिल्लीकर सोडत नाहीत. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून गुजरातला नेले व त्याचे समर्थन श्री. फडणवीस करतात. मुख्यमंत्री शिंदे हे स्वतःस शिवसैनिक समजतात. फडणवीसांच्या भूमिकेस त्यांचा पाठिंबा आहे काय? मुंबईतील अनेक केंद्र सरकारी कार्यालये इतर राज्यांत हलवली. एअर इंडियाचे मुख्यालयही नेले, असे बरेच काही पडद्यामागे घडते आहे. शिवसेना या सगळ्यांविरुद्ध सर्वच पातळ्यांवर आवाज उठवीत राहिली. कारण हाच आवाज महाराष्ट्राचा आहे व राहील! मुख्यमंत्री शिंदे यांना या सगळ्या विषयांवर भूमिका घ्यावी लागेल. ते दिल्लीस निघाले आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी इतकेच. त्यांच्या गटास मंत्रीपदे वाढवून मिळावीत यासाठीच हा दिल्ली दौरा असेल तर काहीच बोलायचे नाही. भाजपच्या ‘हो’ला ‘हो’ केलेत तर मुंबई हातची जाईलच, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे मनसुबे भाजप तडीस नेईल. तेव्हा शिंदे गट काय करणार? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.
अधिक वाचा : CM एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदी-शहांशी करणार चर्चा; फडणवीसांसाठी धोक्याची घंटा?
महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे व त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असे कर्नाटकातील भाजपचे मंत्री जाहीरपणे बोलतात असे अग्रलेखात म्हटले आहे. तसेच यावर ना मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ना नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका! महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस या दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे असेही अग्रलेखात म्हटले आहे.
अधिक वाचा : संजय राऊतांनी पवित्रा बदलला, बंडखोर आमदारांना म्हणाले...
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.