अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट आम्ही रिचवला, आता आम्ही तयार आहोत: सामना 

मुंबई
पूजा विचारे
Reported by टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा
Updated Nov 13, 2019 | 09:27 IST

संजय राऊत गेल्या दोन दिवसांपासून लीलावती रूग्णालयात आहेत. आजचा अग्रलेख राऊतांनी हॉस्पिटलच्या बेडवरच बसून लिहिला आहे. अग्रलेख हाताना लिहतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. अग्रलेखात राऊतांनी भाजपवर टीका केलीआहे.

Sanjay Raut
लीलावतीमध्ये लिहिलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात भाजपवर टीका 

थोडं पण कामाचं

  • शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'चे संपादक संजय राऊत गेल्या दोन दिवसांपासून लीलावती रूग्णालयात आहेत.
  • आजचा अग्रलेख राऊतांनी हॉस्पिटलच्या बेडवरच बसून लिहिला आहे.
  • या अग्रलेखात राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.

शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'चे संपादक संजय राऊत गेल्या दोन दिवसांपासून लीलावती रूग्णालयात आहेत. आजचा अग्रलेख राऊतांनी हॉस्पिटलच्या बेडवरच बसून लिहिला आहे. अग्रलेख हाताना लिहतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आजच्या सामनाच्या संपादकीयमध्ये नेमकं काय असणार यांची उत्सुकता सर्वांना लागली होती. या अग्रलेखात राऊतांनी भाजपवर टीका करत महाराष्ट्रात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती कोणामुळे ओढावली असा सवाल उपस्थित केला. त्यांनी विंदा करंदीकरांच्या सब घोडे बारा टक्के या कवितेच्या शीर्षकानुरूप अग्रलेखाची सुरूवात केली आहे. 

सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळय़ात जास्त गोंधळ व भेसळ करीत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात जो खेळ मांडला आहे त्यामुळे कुणाचा कंडू शमणार असेल तर त्याने जरूर खाजवत बसावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. त्यासोबतच भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट आम्ही रिचवल्यावर आता महाराष्ट्रातील अस्थिरता संपविण्यासाठी  नीळकंठ  व्हायला आम्ही तयार आहोत. अगदी हिंदुत्वाच्याच भाषेत समजावून सांगायचे तर ज्या भगवान शंकराने  हलाहल प्राशन केले त्याच शिवाची भक्ती शिवरायांनी केली व शिवरायांची पूजा शिवसेनेने केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत यावर टीका आणि टिप्पण्या करूद्यात. कश्मीरात मेहबुबा व बिहारात नितीशकुमार यांच्याशी ‘घरोबा’ करताना तत्त्वे आणि विचारांचे काय झाले?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर बिहारात जनादेश नितीशकुमार व लालू यादवांना होता. तो जनादेश मोडून भाजप व नितीशकुमारांचा ‘पाट’ लागलाच ना! महाराष्ट्रात स्थिर राज्य यावे, ते लवकरात लवकर यावे, महाराष्ट्राच्या हिताचे व जनतेच्या कल्याणाचे काही घडावे हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना!, असं त्यांनी अग्रलेखात म्हटलं. 

'सामना'च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  1. महाराष्ट्रात घोडेबाजारास सुरुवात झाली नसली तरी त्या दिशेने पावले पडू लागली आहेत. राष्ट्रपती राजवटीची शिफारस हा त्यातलाच एक प्रकार. आम्ही नाही तर कुणीच नाही हा जो एक अहंकाराचा दर्प निकालानंतर दरवळू लागला आहे तो काही राज्याच्या हिताचा नाही. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या आदेशाचे पालन होत नाही व हा जनादेशाचा अपमान आहे.
  2. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात बसायला तयार आहे. याचा अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठबळ द्यायला तयार आहे असा काढला तर त्यांना मिरच्या झोंबायचे कारण नाही. ठरल्याप्रमाणे भाजप शब्दाला जागला असता तर परिस्थिती इतक्या थरास गेली नसती. 
  3. शिवसेनेस जे ठरले आहे ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकडय़ांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही व राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आहे.
  4. सत्तेचे त्रांगडे राज्यात झाले आहे खरे, पण ते सुटेल. मुळात महाराष्ट्रात 24 तारखेपासून सत्तास्थापनेची संधी असतानाही पंधरा दिवसांत भाजपने हालचाली केल्या नाहीत. म्हणजे भाजप सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष असूनही त्यांना पंधरा दिवस सहज मिळाले व शिवसेनेस धड चोवीस तासही मिळाले नाहीत, हे कसले कायदे? आमदार आपापल्या मतदारसंघात, बरेचसे राज्याबाहेर. त्यांच्या म्हणे सह्या जमवून आणा. तेदेखील चोवीस तासांत. यंत्रणेचा गैरवापर, मनमानी म्हणायची ती यालाच.
  5. राज्यपाल हे सत्ताधारी पक्षाचेच असतात, पण किमानपक्षी त्यांनी स्वतंत्र वृत्तीने वागावे व घटनेतील उद्देशांचे पालन करण्याची आणि कायद्याची बांधिलकी पाळण्याची शपथ विसरू नये एवढी अपेक्षा असते. पण सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळय़ात जास्त गोंधळ व भेसळ करीत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी