Eknath Shinde Not Reachable : विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहाव्या उमेदवाराला दगाफटका झाल्यानंतर शिवसेनेचे 14 आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. शिवसेना पक्षातील अंतर्गत धुसफूस या निमित्ताने जाहीरपणे चव्हाट्यावर येत असल्याची चर्चा आहे. नॉट रिचेबल असणारे सर्व आमदार हे एकनाथ शिंदे समर्थक असल्याचंही समजतं आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे ठाण्यातील नेते एकनाथ शिंदे यांच्यातील धुसफूसही मोठं स्वरूप घेत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले. मात्र काँग्रेसचा उमेदवार पडला. काँग्रेसच्या काही मतांसोबतच शिवसेनेचीही मतं फुटल्याचं दिसून आलं. यासंदर्भात मध्यरात्री वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे 14 आमदार गैरहजर असल्याचं लक्षात आलं. हे सर्व आमदार अद्यापही नॉट रिचेबल असल्याची माहिती असून ते गुजरातमधील सूरतमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे.
1.शहाजी बापू पाटील
2.महेश शिंदे सातारा
3.भरत गोगावले
4.महेंद्र दळवी
5.महेश थोरवे
6.विश्वनाथ भोईर
7.संजय राठोड
8.संदीपान भुमरे
9.उदयसिंह राजपूत
10.संजय शिरसाठ
11.रमेश बोरणारे
12.प्रदीप जैस्वाल
13.अब्दुल सत्तार
14. ज्ञानराज चौगुले
गेल्या काही वर्षांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे यांचा गट सोमवारी संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल होता, अशी माहिती समोर आली होती. या बाबीची खातरजमा करण्यासाठीच वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांच्या बैठकीचं नियोजन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीला सर्व आमदार हजर राहिले मात्र नेमके एकनाथ शिंदे समर्थक आमदार पोहोचले नाहीत. सोमवारी संध्याकाळपासून ते मंगळवारपर्यंत ते नॉट रिचेबल होते.
अधिक वाचा - जनताभिमुख सरकार स्थापन करत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरू राहिल - देवेंद्र फडणवीस
शिवसेना आमदारांची आज दुपारी 12 वाजता पुन्हा एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात, ते पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे. या आमदारांनी जर काही टोकाचा निर्णय घेतला, तर महाविकास आघाडीच्या भवितव्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा - Yoga Day 2022 : योग आहे भारतीय नेत्यांचा फिटनेस मंत्र, असे ठेवतात स्वतःला फिट अँड फाईन
महाविकास आघाडीतून जर एकनाथ शिंदे समर्थक 13 आमदार फुटून गेले, तर मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निव़णुकीत सत्ताधारी पक्षाचे आणि सत्ताधारी समर्थक आमदार फोडून भाजपने अगोदरच महाविकास आघाडीच्या गोटात असुरक्षिततेचे वातावरण तयार केले आहे. त्यात जर हा गट फुटला तर महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांशी याबाबत सविस्तर चर्चा केल्याचं वृत्त आहे. पुढील काही तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक मानले जात आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.